खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:39 IST2025-08-20T11:37:32+5:302025-08-20T11:39:09+5:30
अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली.

खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
बीड : जिल्ह्यातील न्यायालयीन क्षेत्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता व्ही. एल. चंदेल (वय अंदाजे ४०) यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास न्यायालयीन कर्मचारी व वकील कामकाजासाठी हजर झाले असता ही घटना निदर्शनास आली. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली.
चंदेल यांची नुकतीच, जानेवारी २०२५ मध्ये, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली होती. फक्त सात-आठ महिन्यांतच त्यांनी जीवन संपवल्याने सहकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला असून पुढील तपास सुरू आहे.