पोलिस सायरन वाजवत निघालेल्या कारने पोलिसालाच ८० मीटर फरफटत नेले, बीडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:13 IST2025-09-02T14:12:45+5:302025-09-02T14:13:27+5:30
पोलिसाला फरफटत नेणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

पोलिस सायरन वाजवत निघालेल्या कारने पोलिसालाच ८० मीटर फरफटत नेले, बीडमधील घटना
दिंद्रुड ( बीड) : नित्रुड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलिस सायरन वाजवत निघालेल्या भरधाव वेगातील कारने ८० मीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० ऑगस्ट रोजी नित्रुड (ता. माजलगाव) गावात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालखी महामार्गावर मिरवणूक सुरू होती. याचवेळी एका खाजगी एक्सयूव्ही (MH 14 DT 3514) कारमधून पोलीस सायरन वाजवत चालक वेगात येत होता. बंदोबस्तावर असलेले दिंद्रुड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार युवराज श्रीडोळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाहीरवाळ, महेश साळुंखे, होमगार्ड धायजे या सहकाऱ्यांसोबत ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत गाडी थेट श्रीडोळे यांच्या अंगावर घातली. गाडीची धडक बसल्यानंतर श्रीडोळे यांना ८० मीटर फरफटत नेत चालक पळून गेला. या घटनेत श्रीडोळे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
चालकावर गुन्हा दाखल
या घटनेनंतर युवराज श्रीडोळे यांच्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर खूनाचा प्रयत्न, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी आणि वाहनाचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड आणि त्यांचे सहकारी करत आहेत.