राज्यातील ९ महिलांसह १६ सरपंच स्वातंत्र्य दिनाचे पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 08:22 IST2025-08-14T08:22:29+5:302025-08-14T08:22:58+5:30
महाराष्ट्रातील ९ महिलांसह १६ सरपंचांना आमंत्रण

राज्यातील ९ महिलांसह १६ सरपंच स्वातंत्र्य दिनाचे पाहुणे
बीड/नवी दिल्ली :दिल्लीतील ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाराष्ट्रातील ९ महिलांसह १६ सरपंचांना आमंत्रित करण्यात आले आहे.
त्यामध्ये प्रमोद लोंढे (लोंढेवाडी, जि. सोलापूर), जयश्री इंगोले (खासळा नाका, जि. नागपूर), संदीप ढेरंगे (कोरेगाव भीमा, जि. पुणे), डॉ. अनुप्रिता भांडे (म्हातोडी, जि. अकोला), नयना भुसारे (भावसे, जि. ठाणे), सुनीता मिटकरी (ढोरखेडा, वाशिम), अपर्णा राऊत (कोंढाळा, जि. गडचिरोली), संजीवनी पाटील (खर्डा, जि. अहिल्यानगर), चंद्रकुमार बहेकार (भेजपार, जि. गोंदिया), रोमिला बिसेन (केसलवाढा, जि. भंडारा), सूरज चव्हाण (चिंचाळी, जि. रत्नागिरी), पार्वती हरकल (कुंभारी, जि. परभणी), प्रमोद जगदाळे (बिदल, जि. सातारा), शशिकांत मांगले (कसबेगव्हाण, जि. अमरावती) आणि प्रभावती बिराजदार (बामणी, जि. लातूर) यांचा समावेश आहे.
मस्साजोगच्या महिला सरपंचांनाही निमंत्रण
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वर्षा सोनवणे यांच्याकडे १ जानेवारी २०२५ पासून पदभार देण्यात आला. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ५ मे २०२४ पासून नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मस्साजोग येथे नदी खोलीकरण व तलावातील गाळ काढण्याचे काम झाले होते. या कामामुळे गावातील विहिरी आणि बोअरची पाणीपातळी वाढून संपूर्ण शिवार हिरवेगार झाले. याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत दिल्लीच्या जलशक्ती मंत्रालयाला अहवाल पाठवला. या अहवालावर पंतप्रधानांनी मस्साजोगच्या कार्याचे कौतुक केले आहे. सध्या सरपंच असलेल्या वर्षा सोनवणे आणि त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे खास निमंत्रण पाठवण्यात आले. सोनवणे दाम्पत्य बुधवारी दिल्लीसाठी रवाना झाले आहे.