प्रेमसंबंधात ठरत होता अडसर, आईनेच केला १४ वर्षीय मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:24 PM2024-03-04T19:24:54+5:302024-03-04T19:26:36+5:30

पोलिस तपासात उलगडले रहस्य

14-year-old boy killed by mother after hurdle in relationship | प्रेमसंबंधात ठरत होता अडसर, आईनेच केला १४ वर्षीय मुलाचा खून

प्रेमसंबंधात ठरत होता अडसर, आईनेच केला १४ वर्षीय मुलाचा खून

बीड : प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत असलेल्या १४ वर्षीय मुलाचा त्याच्या आईनेच खून केल्याचा प्रकार पेठ बीड पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरूद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील दाऊदपुरा भागातील २५ जानेवारी रोजी शेख इजान शेख तैवर हा १४ वर्षीय मुलगा बेशुद्ध झाला असल्याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली. शेजाऱ्यांनी इजानला जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पेठ बीड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन पूर्ण केल्यानंतर इजानवर दफनविधी करण्यात आला.

मयत शेख इजान याच्या प्रोव्हिजनल सर्टिफिकेटवर नाक, तोंड व मान कशाच्या तरी साहाय्याने दबल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. या कारणावरून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचा अभिप्राय होता. त्यामुळे घातपात असल्याचे समोर आले. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी तपासामध्ये जबाब नोंदविले असता मयत इजानची आई शेख नाजिया हिचे काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले. तसेच एका २८ वर्षीय तरुणासोबत मागील एक वर्षापासून संबंध असल्याचेही समोर आले. दरम्यान, २५ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता शेख नाजिया हिच्या घरातून आरडाओरडा झाल्याचा आवाज आला तेव्हा दोघांनी दरवाजा ढकलला असता आतून दरवाजा बंद होता. त्यानंतर चौघांनी दरवाजा वाजविला असता शेख नाजिया हिने दरवाजा उघडला असता घरातील कॉटवर मुलगा इजान हा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याला हात लावून जागे करण्याचा प्रयत्न केला असता तो जागा झाला नाही. त्यामुळे दोघांनी त्याला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात नेले असता मयत घोषित केले. शेख इजान याचा शवविच्छेदन अहवाल व त्याची आई शेख नाजिया हिने दिलेला जबाब यामध्ये तफावत आढळून आली.

खोटी दिली माहिती
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शेख इजानची आई शेख नाजिया हिचे परपुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. मुलगा इजान पाणी प्यायला व बेशुद्ध पडला, असे खोटे सांगितले असल्याचेसुद्धा निष्पन्न झाले. यावरून शेख नाजिया हिने बंद घरामध्ये मुलगा इजान याचा नाक, तोंड व मान कशाच्या तरी साहाय्याने दाबून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून शेख नाजिया शेख तैवर हिच्याविरूद्ध पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मुदीराज तपास करीत आहेत.

Web Title: 14-year-old boy killed by mother after hurdle in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.