बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:40 IST2025-08-06T14:39:30+5:302025-08-06T14:40:03+5:30
शाओमीची कार बुक करणारे ग्राहक आता सोशल मीडियावर या विषयावरून व्यक्त होऊ लागले आहेत. कंपनी पूर्ण पैसा डिलिव्हरीच्या आधीच द्या म्हणून सांगत आहे.

बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
चीनचीशाओमी ही टेक कंपनी आता कार निर्मितीत उतरली आहे. या कंपनीने हायफाय स्पोर्ट कार लाँच केली आहे. या कारच्या खरेदीसाठी चिनी लोकांनी बुकिंग केले होते. यासाठी काही रक्कमही भरली होती. आता शाओमीने या ग्राहकांना आठवड्याभराची मुदत देत पूर्ण पैसे भरा नाहीतर बुकिंगची रक्कम विसरा, अशी नोटीसच पाठविली आहे.
शाओमीची ईलेक्ट्रीक कार बुक करणारे ग्राहक आता मोठ्या संकटात सापडले आहेत. कंपनीने अचानकच नोटीस पाठवून आठवड्याची मुदत दिली आहे. एवढ्या कमी वेळात एवढी मोठी रक्कम कुठून भरायची असा प्रश्न आता या ग्राहकांसमोर पडला आहे. जर रक्कम भरली नाही तर बुकिंगवेळी दिलेला पैसाही जप्त केला जाणार असल्याचे शाओमीने धमकावले आहे.
शाओमीची कार बुक करणारे ग्राहक आता सोशल मीडियावर या विषयावरून व्यक्त होऊ लागले आहेत. कंपनी पूर्ण पैसा डिलिव्हरीच्या आधीच द्या म्हणून सांगत आहे. असे करून कंपनी आधीच्या आश्वासनांपासून दूर जात आहे. ग्राहक गाडी तपासल्यानंतर पूर्ण पैसे देऊ शकतात असे कंपनीने आधी जाहीर केले होते. परंतू, आता आधी पैसे मागितले जात आहेत, अशी तक्रार या लोकांनी केली आहे.
चिनी मीडिया सिना टेक आणि ऑटो सोहूने याबाबतचे वृत्त दिले आहे. अद्याप अनेक ग्राहकांना २२-२५ आठवड्यानंतर कार डिलिव्हर केली जाणार आहे. तरीही आताच त्यांच्याकडे पैसे मागितले जात आहेत. नाहीतर त्यांची ऑर्डर रद्द केली जाणार असल्याचे कंपनीचे प्रतिनिधी सांगत आहेत. तसेच ५००० युआन एवढी रक्कम देखील जप्त केली जाणार आहे. शाओमीने या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.