टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:34 IST2025-07-15T10:33:16+5:302025-07-15T10:34:07+5:30
Tesla Model Y Price Reveal: टेस्लाचा पहिला शोरुम मुंबईतील बीकेसीमध्ये सुरु करण्यात आला आहे. यावेळी कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे.

टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रीक वाहन कंपनीने आज भारतात पाऊल ठेवले आहे. टेस्लाचा पहिला शोरुम मुंबईतील बीकेसीमध्ये सुरु करण्यात आला आहे. यावेळी कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे. याची किंमत थोडीथोडकी नसून अमेरिकी बाजारापेक्षा तब्बल १५ लाखांनी जास्त ठेवण्यात आली आहे.
टेस्लाने कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयुव्ही मॉडेल वाय भारतात लाँच केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एका चार्जमध्ये 575 किमीपर्यंत जाऊ शकणार आहे. ही इलेक्ट्रिक कार दोन प्रकारांमध्ये येते - लाँग रेंज ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) आणि लाँग रेंज रियर व्हील ड्राइव्ह (RWD). अमेरिकेच्या बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत 46,630 डॉलर आहे, तर भारतात टेस्लाने 59,89,000 लाख रुपए एवढी जास्त किंमत ठेवली आहे.
या वाढलेल्या किमती आयात शुल्क आणि लॉजिस्टिक्स खर्चामुळे असू शकतात. टेस्लाच्या शांघाय प्रकल्पातून मॉडेल वायच्या पाच युनिट्स आधीच मुंबईत दाखल झाल्या आहेत. या वाहनांवर प्रति युनिट ₹२१ लाखांपेक्षा जास्त आयात शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले जात आहे. टेस्लाने २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत जागतिक स्तरावर ३८४,१२२ वाहने वितरित केली, जी मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ६०,००० युनिट्स कमी आहेत.
टेस्ला मॉडेल वाय आरडब्ल्यूडी - ५९.८९ लाख रुपये
टेस्ला मॉडेल वाय लाँग रेंज आरडब्ल्यूडी - ६७.८९ लाख रुपये
ही इलेक्ट्रिक कार सुरुवातीला मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राममध्ये उपलब्ध असेल. त्याची डिलिव्हरी कॅलेंडर वर्ष (सीवाय) २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होईल.
किती असेल ईएमआय...
- पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग ₹६००००० अतिरिक्त
- २०२५ च्या चौथ्या तिमाहीपासून डिलिव्हरी
- ₹२२,२२० परत न करण्यायोग्य बुकिंग रक्कम
- ईएमआय - ₹१,२९,१९३/महिना
- ₹६,९१,५१९ डाउन पेमेंट, ६० महिने, ९.००%