Royal Enfield: रॉयल एनफील्डची ऐतिहासिक विक्री; गेल्या महिन्यात एक लाखाचा टप्पा ओलांडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:25 IST2025-10-02T13:22:42+5:302025-10-02T13:25:49+5:30
Royal Enfield Sales In September: रॉयल एनफील्डने सप्टेंबर २०२५ मध्ये विक्रीचे सर्व विक्रम मोडले.

Royal Enfield: रॉयल एनफील्डची ऐतिहासिक विक्री; गेल्या महिन्यात एक लाखाचा टप्पा ओलांडला!
३५० सीसी ते ६५० सीसी श्रेणीतील जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने सप्टेंबर २०२५ मध्ये विक्रीचे सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने १.२५ लाख मोटारसायकलींची विक्रमी विक्री नोंदवली, जी त्यांच्या इतिहासातील सर्वाधिक मासिक विक्री आहे.
या विक्रमी विक्रीमागे भारतीय बाजारपेठेत ३५० सीसी पर्यंतच्या मोटारसायकलींवरील जीएसटीमध्ये झालेल्या कपातीचा मोठा वाटा आहे. जीएसटी दर कमी झाल्याने ग्राहकांचे हजारो रुपये वाचले, ज्यामुळे नवरात्रीच्या हंगामात रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये मोठी गर्दी उसळली.
विक्रीत तब्बल ४३ टक्केची वाढ
सप्टेंबर २०२५ च्या विक्री अहवालानुसार रॉयल एनफील्डने विक्रीमध्ये मोठी झेप घेतली आहे.सप्टेंबर २०२५ मध्ये १,२४,३२८ युनिट्स विकल्या गेल्या. ऑगस्ट २०२५ मध्ये ८६,९७८ युनिट्स विकल्या गेल्या. विक्रीत गेल्या महिन्याच्या तुलनेत ४३ टक्क् ची प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारात १,१३,५७३ युनिट्स विकल्या गेल्या, जी गेल्या वर्षी सप्टेंबरमधील ७९,३२५ युनिट्सच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. निर्यातीतही ४१ टक्के वाढ नोंदवत हा आकडा १० हजार ७५५ युनिट्स वर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात, रॉयल एनफील्डच्या बाईकची एकूण विक्री मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक आहे.
सीईओ काय म्हणाले?
रॉयल एनफील्डच्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये क्लासिक ३५०, बुलेट ३५०, हंटर ३५०, मेटीओर ३५०, हिमालयन ४५०, ६५० ट्विन्स (इंटरसेप्टर ६५०, कॉन्टिनेंटल जीटी ६५०) आणि नवीन गेरिला ४५० व बेअर ६५० यांसारख्या मोटारसायकलींचा समावेश आहे. रॉयल एनफील्डचे सीईओ बी. गोविंदराजन यांनी म्हणाले की, "आम्ही आतापर्यंतची आमची सर्वोच्च मासिक विक्री गाठली आहे आणि या महिन्यात १,००,००० हून अधिक किरकोळ विक्रीचा टप्पा ओलांडला आहे."