कारच्या काचेवरील पाणी असे घालवा...चटकन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:35 IST2018-09-04T19:35:02+5:302018-09-04T19:35:45+5:30
पावसाळ्यात कार चालविणे थोडे त्रासदायक असते. पावसाचे पाणी सारखे काचेवर पडत असल्याने पुढचे किंवा बाजुचे पाहणे कठीण होते.

कारच्या काचेवरील पाणी असे घालवा...चटकन...
मुंबई: पावसाळ्यात कार चालविणे थोडे त्रासदायक असते. पावसाचे पाणी सारखे काचेवर पडत असल्याने पुढचे किंवा बाजुचे पाहणे कठीण होते. जर वायपर काम करत नसेल तर आणखीनच कठीण. काही वस्तूंचा वापर केल्यास या समस्येपासून सुटका करून घेता येते.
रेन रिपेलंटच्या वापराने काचेवरील पाणी चटकन ओघळते. पाऊस सुरु होण्यापूर्वी किंवा कारमधून प्रवासास निघताना काच पाण्याने धुवून घ्यावी. कपड्याने पुसुन घेतल्यानंतर रेन रिपेलंट लावावे. यामुळे पावसात वायपर्स लावण्याची गरजही भासणार नाही. या रिपेलंटचा वापर मागील काचेसाठी केल्यास उत्तम. कारण काही मॉडेलमध्ये मागील काचेवर वायपर नसतो. यामुळे पावसाचे पाणी पडल्यास मागचे काहीच दिसत नाही. रात्रीच्यावेळी तर पिवळी लाईट पसरते.
याचबरोबर खिडक्यांच्या काचांनाही रिपेलंट लावावे. यामुळे साईड मिररमधून मागचे पाहणे सोपे ठरते. तसेच काचांमधून आजुबाजुने गाडी जात, येत असल्यास त्याचाही अंदाज येतो.
रिपेलंट कसे काम करते?
काचेवर रिपेलंट लावल्यास पडलेल्या पाण्याचे छोटे छोटे थेंब बनतात. म्हणजेच काचेवर तुळतुळीतपणा येतो. यामुळे पाण्याच्या थेंबांना अडकण्यासाठी घर्षण जागाच न मिळाल्याने ते काचेवर टिकत नाहीत व खाली ओघळतात.
रिपेलंटची किंमत
रेन रिपेलंट ऑनलाईन किंवा बाजारात आरामात मिळते. हे 350 रुपयांपासून मिळते. यासाठी चांगल्या कंपन्यांचे उत्पादन घेतलेले चांगले.