देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'या' दिवशी होणार लाँच; किंमत Alto पेक्षा कमी असेल, जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 14:40 IST2022-11-05T14:39:39+5:302022-11-05T14:40:20+5:30
EAS-E : स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोटोटाइप व्हेरिएंट तयार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'या' दिवशी होणार लाँच; किंमत Alto पेक्षा कमी असेल, जाणून घ्या फीचर्स...
नवी दिल्ली : मुंबईतील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक व्हीकल स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिकने 16 नोव्हेंबरला मायक्रो-इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. या कारला EAS-E असे नाव देण्यात आले आहे. या ब्रँडची इच्छा आहे की, ही कार दररोज लोकांनी वापरावी. पीएमव्ही इलेक्ट्रिक पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (PMV) नावाचा संपूर्ण नवीन विभाग तयार करायचा आहे. EAS-E हे पीव्हीएम इलेक्ट्रिकचे पहिली कार आहे आणि त्याची किंमत 4 लाख ते 5 लाख रुपये असणार आहे.
स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोटोटाइप व्हेरिएंट तयार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. स्टार्टअप सध्या त्यांना लवकरात लवकर उत्पादनात आणण्यासाठी काम करत आहे. पीएमव्ही इलेक्ट्रिकचे संस्थापक कल्पित पटेल म्हणाले, "आम्हाला उत्पादनाचे अधिकृत अनावरण करताना आनंद होत आहे. कंपनीसाठी हा मैलाचा दगड ठरेल, कारण आम्ही एका भारतीय कंपनीने उत्पादित केलेले जागतिक दर्जाचे उत्पादन तयार केले आहे. पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (पीएमव्ही) नावाचा एक नवीन विभाग सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, ज्याचा उद्देश दैनंदिन वापरासाठी आहे."
कार अवघ्या 4 तासांत होईल चार्ज
पीएमव्ही EAS-E तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केली जाणार आहे. सिंगल चार्जवर कारची ड्रायव्हिंग रेंज 120 किमी ते 200 किमी पर्यंत वेगवेगळी असणार आहे. ड्रायव्हिंग रेंज ग्राहकाने निवडलेल्या व्हेरिएंटवर अवलंबून असेल. कारची बॅटरी अवघ्या 4 तासांत चार्ज होईल, असा दावा पीएमव्हीने केला आहे. तसेच, कंपनी 3 kW चा AC चार्जर देत आहे.
कार अतिशय कॉम्पॅक्ट
या मायक्रो इलेक्ट्रिक कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी असणार आहे. कारचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल, तर ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी असेल. तसेच, ईव्हीचे कर्ब वजन सुमारे 550 किलो असू शकतो. कार अतिशय कॉम्पॅक्ट आहे आणि शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. याशिवाय, कारच्या लहान आकारामुळे, पार्क करणे देखील सोपे होईल.
कारमधील फीचर्स...
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास पीएमव्ही इलेक्ट्रिक कंपनी म्हणते की, EAS-E मध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, एक यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि सीट बेल्ट यांसारखे फीटर्स मिळतील.