डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:40 IST2026-01-12T11:40:47+5:302026-01-12T11:40:57+5:30
Electric Scooter Sales December 2025 : वाहन डेटानुसार गेल्या महिन्यात एकूण ९३,००० इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली. यात प्रमुख कंपन्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे.

डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली?
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E2W) बाजारपेठेत २०२५ या वर्षाचा शेवट अत्यंत रंजक वळणावर झाला आहे. डिसेंबर २०२५ च्या ताज्या आकडेवारीनुसार, TVS Motor ने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, एकेकाळी बाजारावर राज्य करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकला मोठा धक्का बसला असून कंपनी आता पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
वाहन डेटानुसार गेल्या महिन्यात एकूण ९३,००० इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली. यात प्रमुख कंपन्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
१. TVS Motor: २५,०३९ युनिट्सच्या विक्रीसह टीव्हीएस पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, नोव्हेंबरच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत १७.४% ची घट झाली आहे.
२. Bajaj Chetak: बजाजच्या विक्रीत सर्वात मोठी घसरण (२६.४%) पाहायला मिळाली. १८,७९० युनिट्ससह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
३. Ather Energy: एथरने १७,०५२ युनिट्सची विक्री केली असून त्यांच्या विक्रीत १६.१% ची घट झाली आहे.
४. Hero Vida: हिरोच्या 'विडा' ब्रँडने १०,७०१ युनिट्सची विक्री करत आपले चौथे स्थान टिकवून ठेवले आहे.
५. Ola Electric: या यादीत केवळ ओला इलेक्ट्रिकने ७.४% ची सकारात्मक वाढ नोंदवली आहे. ८,४०० वरून ९,०२० युनिट्सपर्यंत त्यांनी मजल मारली असून त्यांचा मार्केट शेअर ९.३% वर पोहोचला आहे.
उर्वरित कंपन्यांमध्ये ग्रीव्हज इलेक्ट्रिक आणि बीगॉस यांनी आपली उपस्थिती टिकवून ठेवली असली तरी, एकूण ९३,००० युनिट्सच्या या बाजारपेठेत प्रस्थापित ऑटो कंपन्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे.
ओलाच्या न वाढीचे कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, ओलाची सर्व्हिस अत्यंत खराब असल्याने त्याचा फटका कंपनीला बसला होता. आता राबवलेला 'हायपरसर्व्हिस' कार्यक्रम, ज्यामध्ये ७७% तक्रारींचे निवारण त्याच दिवशी केले जात आहे, त्याचा सकारात्मक परिणाम विक्रीवर होताना दिसत आहे. तरीही ओलाच्या स्कूटरची किंमत थोडी जास्तच असल्याने तसेच ओलाच्या मोटरसायकलला फार कमी प्रतिसाद मिळत असल्याचा फटका कंपनीला बसत आहे.