महिंद्रा सुसाट..; लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी XUV 7XO आणि XEV 9S चे 93 हजार युनिट्स बुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:52 IST2026-01-15T19:51:05+5:302026-01-15T19:52:38+5:30
भारतीय ग्राहकांचा महिंद्राच्या गाड्यांवरील विश्वास वाढतोय.

महिंद्रा सुसाट..; लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी XUV 7XO आणि XEV 9S चे 93 हजार युनिट्स बुक
भारतीय ऑटोमोबाइल बाजारात SUV सेगमेंटची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशातच, महिंद्रा अँड महिंद्राने या सेगमेंटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या Mahindra XUV 7XO (ICE SUV) आणि Mahindra XEV 9S (इलेक्ट्रिक SUV) या दोन नव्या गाड्यांच्या बुकिंगला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला.
२०,५०० कोटी रुपयांहून अधिकची बुकिंग व्हॅल्यू
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ९३,६८९ बुकिंग्स नोंदवण्यात आल्या असून, हा आकडा एक मोठा विक्रम मानला जात आहे. ही कामगिरी केवळ बुकिंगच्या संख्येपुरती मर्यादित नसून, आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरली आहे. या बुकिंग्सची एकूण किंमत २०,५०० कोटी रुपयांहून अधिक असून, ही गणना एक्स-शोरूम किमतींच्या आधारे करण्यात आली आहे.
या आकड्यांवरून स्पष्ट होते की, भारतीय ग्राहक SUV सेगमेंटमधील नव्या, तंत्रज्ञान-केंद्रित आणि विश्वासार्ह उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवत आहेत. विशेष म्हणजे, ICE आणि इलेक्ट्रिक, दोन्ही प्रकारच्या SUVs ला समान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दोन्ही सेगमेंटमध्ये मजबूत पकड- Mahindra XUV 7XO आणि XEV 9S या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या ग्राहकवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आल्या आहेत. Mahindra XUV 7XO ही पारंपरिक ICE SUV असून, यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय मिळतात.
तसेच, Mahindra XEV 9S ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असून, भविष्यातील मोबिलिटी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांचा विचार करून तिची रचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना XEV 9S ला मिळणारा प्रतिसाद महिंद्राची EV धोरणे योग्य दिशेने असल्याचे संकेत देतो.
डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने
इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंग मिळाल्यानंतर महिंद्राने डिलिव्हरी फेज-वाइज करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mahindra XUV 7XO
डिलिव्हरी : १४ जानेवारी २०२६ पासून सुरू
अनेक शहरांमध्ये ग्राहकांना गाड्या मिळण्यास सुरुवात
Mahindra XEV 9S (Electric SUV)
डिलिव्हरी : जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात,
अंदाजे २६ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता
या पद्धतीमुळे कंपनीला सप्लाय चेन आणि डीलर नेटवर्क अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येणार आहे.
SUV बाजारात महिंद्राची वाढती ताकद
ऑटोमोबाइल तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा आणखी वाढणार आहे. XEV 9S सारख्या SUV मुळे महिंद्राला EV सेगमेंटमध्ये भक्कम स्थान मिळू शकते. त्याच वेळी, XUV 7XO सारखी ICE मॉडेल्स त्या ग्राहकांसाठी आकर्षक ठरणार आहेत, जे अद्याप पूर्णपणे इलेक्ट्रिककडे वळण्यास तयार नाहीत.