४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:30 IST2025-07-21T20:29:28+5:302025-07-21T20:30:05+5:30
Kinetic DX Electric Scooter: या स्कूटरने ४१ वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता.

४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
Kinetic DX Electric Scooter: १९८४ मध्ये Kinetic Engineering आणि Honda यांनी संयुक्तपणे लॉन्च केलेली Kinetic DX स्कूटर आता ४० वर्षांनंतर इलेक्ट्रिक स्वरुपात कमबॅक करत आहे. ही भारतातील पहिली टू-स्ट्रोक ऑटोमॅटिक स्कूटर होती. त्यावेळी ही स्कूर प्रचंड लोकप्रिय झाली. आता फिरोदिया ग्रुप या स्कूटरला इलेक्ट्रिक अवतारात बाजारात आणणार आहे.
गेम चेंजर स्कूटर होती Kinetic Honda DX
Kinetic Honda DX अशा वेळी बाजारात आणण्यात आली होती, जेव्हा भारतातील दुचाकी विभाग वेगाने बदलत होता. त्यावेळी वेस्पा आणि बजाज सारख्या स्कूटरमध्ये मॅन्युअल गियर चेंबर वापरले जात होते, तर कायनेटिक डीएक्सने पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह एक नवीन दिशा दाखवली.
९८ सीसी इंजिन, ७.७ एचपी पॉवर आणि ९.८ एनएम टॉर्कसह या स्कूटरने एक उत्तम ड्रायव्हिंग अनुभव दिला. त्याच्या सीव्हीटी (कंटिन्युअली व्हेरिअबल ट्रान्समिशन) तंत्रज्ञानामुळे स्कूटर चालवणे खूप सोपे झाले. एवढेच नाही, तर या स्कूटरमध्ये सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्टसारखे पर्याय देण्यात आले होते. हे त्या त्या काळातील इतर स्कूटरमध्ये उपलब्ध नव्हते. त्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, स्कूटरचा देखभाल खर्च फक्त ₹२१ प्रति महिना असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये स्पेअर पार्ट्स आणि लेबर चार्जेस सामील होते.
Kinetic Honda DX पुन्हा येतेय
आता देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटला गती मिळत असल्याने, कायनेटिक ग्रीन ब्रँड पुन्हा एकदा ही संस्मरणीय स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या स्कूटरच्या नवीन डिझाइनचे पेटंट घेतले असून, अलीकडेच ही स्कूटर चाचणी दरम्यान दिसून आली आहे. या नवीन कायनेटिक डीएक्स ईव्ही स्कूटरमध्ये जुना रेट्रो लूक मोठ्या कायम ठेवण्यात आला आहे. तसेच, त्यात रुंद हेडलॅम्प, लांब सीट आणि स्टायलिश फ्रंट एप्रन मिळेल.
कधी लॉन्च होणार?
Kinetic Honda DX इलेक्ट्रिक स्कूटर येत्या २८ जुलै २०२५ रोजी लॉन्च केली जाईल. सध्या स्कूटरची किंमत, पॉवरट्रेन, बॅटरी स्पेसिफिकेशन किंवा रेंजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु ऑटो तज्ञांचा असा विश्वास आहे की, ही स्कूटर भारतीय बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना कडक स्पर्धा देईल. भारतीय ईव्ही बाजारात या स्कूटरची बजाज चेतक ईव्ही, टीव्हीएस आयक्यूब, हिरो विडा व्ही१ आणि ओला एस१ एक्स+ आणि प्रो मॉडेल्स सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्सशी थेट स्पर्धा असेल.