Holi 2026: होळीच्या रंगांमुळे कार किंवा बाईक खराब झालीय? फॉलो करा ‘या’ टीप्स, गाडी नव्यासारखी चमकेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:09 IST2026-03-04T14:07:53+5:302026-03-04T14:09:39+5:30
Vehicle Cleaning Tips: काल देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळाला, पण या उत्साहात अनेकदा आपल्या लाडक्या वाहनांवर रंगाचे डाग पडतात. जर तुमच्याही गाडीवर पक्का रंग बसला असेल, तर तो पेंट खराब न करता कसा काढायचा? जाणून घ्या या सोप्या टिप्स!

Holi 2026: होळीच्या रंगांमुळे कार किंवा बाईक खराब झालीय? फॉलो करा ‘या’ टीप्स, गाडी नव्यासारखी चमकेल!
संपूर्ण देशात काल होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, यावेळी चुकून वाहनांवर रंग पडतात आणि किंवा गुलाल उडतो. तुमच्याही वाहनांवर होळीचा पक्का रंग बसला असेल आणि तो निघत नसेल तर, काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे वाहन पुन्हा पूर्वीसारखे चमकवू शकता.
कोमट पाण्याचा वापर
जर वाहनावर सुका गुलाल किंवा हलका रंग असेल, तर तो काढण्यासाठी जास्त उशीर करू नका. सर्वात आधी वाहनाचा वरचा थर काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. त्यानंतर कोमट पाण्यात कोमट पाण्यात थोडे डिटर्जंट मिसळा आणि मऊ कापड किंवा स्पंज या द्रावणात बुडवून रंग लागलेला भाग हळुवारपणे पुसा. महत्त्वाचे म्हणजे, जोरजोरात घासणे टाळा, अन्यथा वाहनांवर ओरखड पडू शकतात. शेवटी मायक्रोफायबर कापडाने गाडी कोरडी पुसून घ्या.
हट्टी डागांसाठी काय कराल?
काही रंग खूप पक्के असतात, जे साध्या पाण्याने निघत नाहीत. अशा वेळी बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर उपयोगी ठरू शकतात. बेकिंग सोड्यात थोडे पाणी मिसळून डागावर १५-२० मिनिटे लावून ठेवा. नंतर मऊ कापडाने पुसून टाका. पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळून डागांवर स्प्रे करा. अगदीच गरज भासल्यास नॉन-जेल टूथपेस्ट किंवा रबिंग अल्कोहोल वापरता येते, पण ते वापरण्यापूर्वी गाडीच्या एका छोट्या भागावर त्याची टेस्ट नक्की करा.
महत्त्वाचा सल्ला
बाजारात वाहनांचे डाग काढण्यासाठी विशेष ऑटो क्लीनर्स उपलब्ध आहेत. उत्पादनावरील सूचना वाचूनच त्याचा वापर करा, जेणेकरून गाडीच्या पेंटचे नुकसान होणार नाही. कडक रसायने किंवा खडबडीत कापड वापरू नका. मायक्रोफायबर कापड हे वाहनासाठी सर्वात सुरक्षित असते. जर डाग खूपच जुने किंवा हट्टी असतील आणि घरगुती उपायांनी निघत नसतील, तर तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.