कोणालाही जमलं नाही, ते बजाज कंपनीनं करून दाखवलं; भारताचं नाव जगात गाजवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 20:24 IST2021-01-05T20:24:09+5:302021-01-05T20:24:41+5:30
कोरोना संकटातही बजाज ऑटोची झेप

कोणालाही जमलं नाही, ते बजाज कंपनीनं करून दाखवलं; भारताचं नाव जगात गाजवलं
नवी दिल्ली: कोरोना काळात जवळपास सगळ्याच कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कित्येक कंपन्यांचं अर्थकारण अद्यापही रुळावर आलेलं नाही. मात्र बजाज ऑटोनं कोरोना संकटातही दमदार कामगिरी केली आहे. एक लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह बजाज जगातील सर्वात मूल्यवान दुचाकी कंपनी ठरली आहे. १ जानेवारीला बजाज कंपनीच्या समभागाची किंमत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) ३ हजार ४७९ रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे कंपनीच्या बाजाप भांडवलानं १ लाख कोटींचा टप्पा पार केला. हा आकडा ओलांडणारी बजाज ही जगातील पहिली कंपनी आहे.
बजाज कंपनीच्या विक्रीत डिसेंबर २०२० मध्ये ११ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. कंपनीनं एका पत्रकाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. 'डिसेंबर २०१९ मध्ये बजाज ऑटोनं ३ लाख ३६ हजार ५५ वाहनं विकली होती. डिसेंबर २०१९ मध्ये हाच आकडा ३ लाख ७२ हजार ५३२ वर गेला. या काळात कंपनीची देशांतर्गत विक्री १ लाख ५३ हजार १६३ वरून १ लाख ३९ हजार ६०६ वर घसरली. मात्र त्याचवेळी निर्यात वाढली,' अशी आकडेवारी कंपनीनं दिली आहे. जगातील इतर कोणतीही कंपनी सध्या तरी बजाज ऑटोच्या आसपासदेखील नाही.
कंपनीनं मोटारसायकल श्रेणीकडे विशेष लक्ष दिलं असून वेगळी रणनीती वापरून लोकांचा विश्वास कमावल्याचं बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितलं. लोकांचा विश्वास जिंकल्यानंच बजाज कंपनी जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी ठरली आहे. जगातील प्रख्यात कंपन्या वापरत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करतो. त्याचमुळे बजाज जगात दुचाकींच्या बाबतीत अव्वल ठरली आहे, असं बजाज पुढे म्हणाले.