ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:53 IST2025-10-08T18:52:46+5:302025-10-08T18:53:15+5:30
वाहनांवरील GST कपातीमुळे कार विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.

ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
Car Sell: भारतातील ऑटोमोबाईल शोरुम्स या नवरात्रीत ग्राहकांनी अक्षरशः गजबजले होते. सरकारच्या जीएसटी कपातीमुळे (GST 2.0) आणि सणासुदीच्या काळात कंपन्यांच्या विविध ऑफर्समुळे देशभरात वाहन खरेदीत अभूतपूर्व वाढ झाली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रवासी वाहनांच्या (Passenger Vehicles) विक्रीत तब्बल 35% वाढ झाली आहे.
ऑटो क्षेत्राला नवसंजीवनी
सप्टेंबर महिन्यात वाहन नोंदणी (Registration) 6% वाढून 18.27 लाख युनिट्सवर पोहोचली, ज्यामुळे मंदावलेल्या बाजारात नवसंजीवनी मिळाली. FADA चे उपाध्यक्ष साई गिरीधर म्हणाले की, सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत ग्राहक नव्या GST दरांची प्रतीक्षा करत होते, त्यामुळे बाजार शांत होता. पण नवरात्री आणि GST 2.0 एकत्र आल्यावर उद्योगात पुन्हा प्रचंड हालचाल सुरू झाली.
पॅसेंजर वाहन विक्रीत जोरदार वाढ
सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 2.99 लाख युनिट्सपर्यंत गेली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 6% जास्त आहे. मात्र खरी झेप नवरात्रीच्या कालावधीत दिसली. या काळात कार विक्री 1.61 लाखांवरुन थेट 2.17 लाख युनिट्सपर्यंत पोहोचली. याचा अर्थ, या नऊ दिवसांत दर तासाला सुमारे 1,250 गाड्यांची विक्री झाली.
डीलर्सच्या म्हणण्यानुसार, GST दरांतील घट आणि आकर्षक फेस्टिव्हल ऑफर्समुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे ग्राहक अधिक प्रमाणात खरेदीसाठी पुढे आले. अनेक शोरुम्समध्ये टेस्ट ड्राइव्ह आणि डिलिव्हरी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
सर्वात यशस्वी सणासुदीचा हंगाम ठरण्याची शक्यता
FADA चे मत आहे की, या वर्षीचा सणासुदीचा काळ भारताच्या ऑटो उद्योगाच्या इतिहासातील सर्वात चांगला सीझन ठरू शकतो. GST 2.0 नंतर वाहनांच्या किंमती आणखी कमी झाल्या आहेत. त्यामुळे नवीन तसेच जुन्या ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात शोरुमकडे मोर्चा वळवला आहे. जर पुरवठा साखळीमध्ये कोणतीही अडचण आली नाही, तर ऑक्टोबर 2025 हा भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगासाठी विक्रमी महिना ठरेल.