True defense; Sister gives life to her brother by donating kidney | खऱ्या अर्थाने रक्षा; किडनी देऊन बहिणीने केले भावाचे आयुष्य ‘घट्ट’

खऱ्या अर्थाने रक्षा; किडनी देऊन बहिणीने केले भावाचे आयुष्य ‘घट्ट’

ठळक मुद्देकुटुंबियांचा अवयवदानाचा संकल्प

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपविते. मात्र, रक्षाबंधनाच्या अवघ्या आठ दिवसांनंतर ओढावलेल्या परिस्थितीने एका बहिणीने स्वत:ची किडनी देऊन भावाच्या आयुष्याची दोरी ‘घट्ट’ केली. बहिणीने भावाची खऱ्या अर्थाने रक्षा केली.

मीरा मनोरंजन चिलवंत (५३) असे या बहिणीचे नाव आहे. मीरा चिलवंत यांनी स्वत:ची किडनी देऊन भाऊ सोमेश्वर वापटे (४९, रा. माजलगाव) यांना किडनी देऊन नव्या आयुष्याची भेट दिली. सोमेश्वर वापटे यांचे माजलगाव येथे कापडाचे दुकान आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. एप्रिल महिन्यात अचानक त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे त्यांना डायलिसिसचा उपचार घ्यावा लागत होता. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण गरजेचे होते. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. सोमेश्वर वापटे यांना सहा बहिणी आहेत. १५ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा करण्यात आला. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस. या रक्षाबंधनाच्या आठव्या दिवशी २३ आॅगस्ट रोजी वापटे यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

लहान बहिणीने किडनी प्रत्यारोपणाची तयारी दर्शविली होती; परंतु ते शक्य होऊ शकले नाही. अखेर किडनी प्रत्यारोपणासाठी बहीण मीरा चिलवंत यांच्या पुढाकारामुळे शक्य आणि यशस्वीही झाले. त्यासाठी मीरा चिलवंत यांना पती, मुलांनी पाठबळ दिले. शहानूरमियाँ दर्गा रोडवरील एका रुग्णालयात हे किडनी प्रत्यारोपण झाले. शस्त्रक्रियेनंतर दोघांची प्रकृती चांगली आहे.

कुटुंबियांचा अवयवदानाचा संकल्प
रक्षाबंधनानिमित्त बहिणीने अनमोल ओवाळणी दिली. माझी ताई आता माझी माय झाली आहे. किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांच्याबद्दलच्या भावना शब्दातही सांगू शकत नाही. शस्त्रक्रियेच्या दिवशीच माझ्या कुटुंबियांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे, असे सोमेश्वर वापटे यांनी सांगितले. भावाची प्रकृती व्यवस्थित झाली आहे, भाऊ सुखरूप उभा राहील, यापेक्षा कोणता मोठा आनंद नाही, असे मीरा चिलवंत म्हणाल्या. 
 

Web Title: True defense; Sister gives life to her brother by donating kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.