There is no fault in duty; The bribe-paying sand smuggler was nabbed by the ACB following a complaint by a police sub-inspector | कर्तव्यात कसूर नाही; लाच देणाऱ्या वाळू तस्कराला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर एसीबीने पकडले

कर्तव्यात कसूर नाही; लाच देणाऱ्या वाळू तस्कराला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर एसीबीने पकडले

ठळक मुद्देदेवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील घटना  पोलीस उपनिरीक्षकानेच केली तक्रार

देवगाव रंगारी ( औरंगाबाद ) : आजवर पोलीस दलात अनेक अधिकारी -कर्मचारी लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याचे प्रकरण झाली आहे. मात्र, एका कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षकाने लाच देणाऱ्या अवैध वाळू तस्कराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून त्याला पकडून दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. 

शासकीय कार्यालयात कनिष्ठ ते वरिष्ठ सर्व स्तरावर अधिकारी आणि कर्मचारी अनेकवेळा लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र अनेक अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. ते कोणत्याच अमिषाला बळी पडत नाहीत. अशीच घटना देवगाव रंगारी पोलीस स्टेशन मध्ये घडली. येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शैलेश उद्धवराव जोगदंड यांना वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणारा गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी (४०, रा. बळेगाव, ता. वैजापूर) याने त्याचे दोन टेम्पो अवैध वाळू वाहतुकीसाठी चालवू द्यावेत. यासाठी प्रतिटेम्पो २५ हजार रुपयांची लाच देऊ केली. परंतु, पोउनि. शैलेश जोगदंड यांना लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सूर्यवंशी याच्या विरोधात तक्रार केली.

मंगळवारी सकाळी पोउनि. शैलेश जोगदंड यांनी वाळू तस्कर गोकुळ सूर्यवंशी यास संपर्क करून लाच स्वीकारण्याबाबत हमी दर्शवली. यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान, गोकुळ सूर्यवंशी हा पोलीस स्थानकात लाचेची रक्कम घेऊन आला. त्याने  पोउनि. शैलेश जोगदंड यांना लाचेची रक्कम देऊ केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत गोकुळ सूर्यवंशी यास लाच देताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई एस. एस. शेख (पोलीस निरीक्षक, जालना), पोलील कॉन्स्टेबल गणेश चेके, गजानन कांबळे, शेख जावेद, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये एका वाळू तस्कराची गाडी पोलिसांनी पकडली होती. यानंतर त्याने लाचेची मागणी आणि मारहाण केल्याचा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस आणि वाळू तस्कर यांच्यात धुसपूस सुरु होती. मंगळवारच्या प्रकरणाला लॉकडाऊनमधील याच पोलीस कारवाईची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.

Web Title: There is no fault in duty; The bribe-paying sand smuggler was nabbed by the ACB following a complaint by a police sub-inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.