औरंगाबादमध्ये कॉपी पकडल्यामुळे विद्यार्थ्याने घेतली पाचव्या मजल्यावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:37 IST2018-04-11T00:35:01+5:302018-04-11T00:37:09+5:30
सराव परीक्षेत कॉपी पकडल्याने कारवाई होण्याच्या भीतीने नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. बीड बायपासवरील एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.१०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

औरंगाबादमध्ये कॉपी पकडल्यामुळे विद्यार्थ्याने घेतली पाचव्या मजल्यावरून उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सराव परीक्षेत कॉपी पकडल्याने कारवाई होण्याच्या भीतीने नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. बीड बायपासवरील एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.१०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गंभीररीत्या जखमी विद्यार्थ्याला तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सचिन सुरेश वाघ (१९, रा. नवनाथनगर, हर्सूल) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षक व प्रशासनाच्या मानसिक त्रासातूनच विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राजकारणी व विद्यार्थ्यांनी केला आहे, तर प्रशासनाने दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत, परीक्षेत कॉपी पकडल्याने कारवाईच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
‘न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री’ या विषयाचा मंगळवारी पेपर होता. सकाळी ९ वा. परीक्षा सुरू झाली अन् अर्ध्या पाऊण तासाने त्याच्याकडे वर्गात कॉपी आढळून आली. त्याच्याकडून पेपर घेण्यात आला आणि प्राचार्यासमोर त्यास उभे करण्यात आले होते.
कारवाईने खचला अन् मारली उडी
कॉपी सापडल्याने महाविद्यालयाने केलेल्या कारवाईमुळे घरच्या मंडळींना कसे सामोरे जावे या द्वंद्वात अडकलेल्या सचिनने काही मिनिटांत महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जिन्यातील काचेचे तावदान हटवून त्यातून खाली उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी त्याने एमआयटीतच शिक्षण घेत असलेला मित्र सौरभ रणदिवे याला मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु सौरभचीही परीक्षा चालू असल्याने त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सचिनने घराजवळील मित्र शुभम राठोडला फोन करून, तो आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.
सचिन व शुभम या दोन्ही मित्रांचे वारंवार फोन येत असल्याने सौरभने फोन उचलला अन् पेपर अर्ध्यावर सोडून त्याच्या कॉलेजच्या दिशेने धाव घेतली. समोरचे चित्र पाहून सौरभ थबकला. महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून सचिन खिडकीतून उडी मारण्याच्या तयारीत होता. ‘नको नको असे नको करू नकोस,’ आरडाओरड सुरू होता. जिन्याने पळत जाऊन त्याला रोखेपर्यंत त्याने उडी मारली होती. सौरभने अन्य मित्रांच्या मदतीने त्वरित दवाखान्यात दाखल केले.
विद्यार्थी सेनेने घातला घेराव..
महाविद्यालयाच्या प्राचार्या हेलन राणी यांना निलंबित करण्याची मागणी विद्यार्थी सेनेच्या वतीने राजू जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, हनुमान शिंदे, पराग कुंडलवाल यांच्यासह विद्यार्थ्यांनी मुनीष शर्मा यांना घेराव घालून केली.
शांत व हुशार विद्यार्थी...
सचिनचे वडील बस कंडक्टर असून, ते पुणे येथे नोकरीला आहेत. नवनाथनगरात मोठी बहीण,भाऊ, आई राहतात. दडपणामुळेच हा प्रकार त्याने केला असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. शुभम राठोड सचिनच्या आईला घेऊन दवाखान्यात पोहोचला; परंतु त्याचे वडील मात्र आलेले नव्हते. त्याने महाविद्यालयाची फीसदेखील भरलेली होती. त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्यात आलेली आहे.