The sewalaya struggles to remain Happy Village 'Happy' | हॅप्पी व्हिलेज ‘हॅपी’ राहावे म्हणून सेवालयाचा संघर्ष 

हॅप्पी व्हिलेज ‘हॅपी’ राहावे म्हणून सेवालयाचा संघर्ष 

- डॉ. संदीप सिसोदे, औरंगाबाद

सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उंची कमी भरल्याने पूर्ण झाले नाही. समाजसेवेचा एक मार्ग म्हणून त्याने पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने औरंगाबादला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारितेची डिग्री घेतली. लातूरला येऊन त्याने एका प्रतिष्ठित दैनिकात नोकरी आणि जर्नालिझम कॉलेजमध्ये प्राध्यापकी सुरू केली. समाजसेवेची आवड असल्याने, दहा-बारा तरुणांचा 'आम्ही सेवक' या नावाने ग्रुप केला आणि लातूर शहरात स्वच्छता निवारणाचे काम सुरू केले.  समाजसेवेच्या वाटेवर चालणाऱ्या या तरूणाला एचआयव्हीग्रस्तांच्या प्रश्नाने अस्वस्थ केले. याच अस्वस्थतेतून पुढे लातूरजवळ ‘सेवालय’चा जन्म झाला. रवी बापटले, हे या तरूणाचे नाव. 

एके दिवशी ते मित्रासोबत एका खेड्यात गेले. तिथे एका घरात एक मुल मृत झाल्याचे कळले. पण त्याचा अंत्यविधी करायला कोणीही तयार नाही. कारण ते मुल एड्सने दगावले होते. रवी  मित्रासोबत घरी गेले तेव्हा समोरचे दृष्य बघून हादरून गेले. त्या लेकराला मुंग्यांनी पूर्ण खाऊन टाकले होते. केवळ हाडांचा सांगाडा शिल्लक होता. मित्राला घेऊन त्यांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. एचआयव्हीबाबत समाजात असलेली भीती व अज्ञान त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी निर्धार केला की, एचआयव्ही संक्रमित बालकांच्या पुनर्वसनासाठी आपले आयुष्य लावायचे. हे काम सुरू करायचे तर, त्यासाठी जागा हवी होती. रवीचे कराटे क्लासमधील मित्र शांतेश्वर मुक्ता यांना ही अडचण सांगितली. ते त्यांच्या आजोबाशी बोलले. त्यांनी या कामासाठी त्यांची हसेगाव(जि. लातूर)जवळील साडे पाच एकर माळाची जमीन दान दिली. रवी बापटले यांनी सुरुवातीलाच हे काम लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेतला. कामाची सुरूवात म्हणून२००७ मध्ये एका छोट्या रूमचे बांधकाम सुरू केले. त्यावेळी एचआयव्ही बाबत समाजात खूप गैरसमज आणि भीती होती. हा प्रकल्प होण्याला गावातील काही मंडळींचा विरोध होता. त्यांनी अफवा पसरवून लोकांची माथी भडकावली. त्यांनी जेसीबी मशीन लावून बांधकाम पाडले. या संघर्षाला तोंड देतच सेवालयाची वाटचाल सुरू झाली. एआरटी सेंटरवर माहिती घेऊन, जिल्हा बालकल्याण समितीमार्फत जन्मजात एचआयव्ही संक्रमित मुले येऊ लागली. रवीनी कॉलेज विद्यार्थ्यांचे शिबीर घेऊन, तीन-चारशे आंब्यांची, नारळाची व फुलझाडे लावली. माळरानावर हिरवाई अवतरली. लोकसहभागातून मुलांना राहण्यासाठी छोट्या कुट्या उभा राहिल्या. तत्कालीन खासदार रुपाताई पाटील यांच्या फंडातून एक बहुउद्देशीय हॉल तयार झाला. पुढे खा.जनार्दन वाघमारे यांच्या निधीतून मुलींसाठी तीन खोल्या तयार झाल्या. ही सगळी मुलं हसेगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ लागली. कोणीतरी विषपेरणी केली. सेवालयातील मुलं शाळेत येणार असतील तर, आमची मुलं शाळेत येणार नाहीत, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली. हा प्रश्न देशपातळीवर चर्चिला गेला. माध्यमांतून मोठी चर्चा झाली. शेवटी रवी बापटले यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवला.

त्यावेळी एचआयव्हीची लागण म्हटली की, मृत्यू असे समीकरण होते. मात्र सेवालयातील आरोग्यदायी, आनंददायी वातावरण, सकस आहार आणि योग्य वैद्यकीय उपचारांमुळे इथं आलेली मुले सामान्य मुलांप्रमाणे वाढू लागली. शाळेतून लातूरच्या महाविद्यालयात जाऊ लागली. १८वर्षांचा टप्पा ओलांडून तारूण्यात पदार्पण करू लागली. कायद्याप्रमाणे सेवालयात १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचेच संगोपन करण्याची परवानगी होती. यापुढच्या मुला-मुलींना कुठे पाठवायचे, हा गंभीर प्रश्न होता. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही त्यांना सामावून घेणारी जागा नव्हती. त्यातून रवी बापटले यांनी हॅपी इंडियन व्हिलेजचे धाडसी पाऊल टाकले. योगायोगाने सेवालयापासूनच जवळच असलेल्या डोंगरावर जागा विकत मिळाली. यासाठी पैसे उभारण्याची गरज होती. सेवालयातील छोट्या मोठ्या ४०मुलांच्या सहभागातून सेवालय म्युझिक शो हा सांस्कृतिक कार्यक्रम साकार झाला. याचे महाराष्ट्रात व इतर राज्यांतही कार्यक्रम झाले. यातून चांगला निधी तर गोळा झालाच शिवाय यात सहभागी मुला-मुलींना प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.
लोकांच्या पाठबळातून हॅपी इंडियन व्हिलेज साकार झाले. मुलांना राहण्यासाठी खोल्या, सुंदर अशी बहुउद्देशीय इमारत उभी राहिली. भाजीपाला लागवड व विक्री, साड्यांपासून पिशव्या, सेवालयातील आंब्यांची विक्री, गणपतीच्या मुर्ती, राख्यांची विक्री असे विविध उपक्रम मुलांच्या स्वावलंबनासाठी राबवले जात आहेत. वय झालेल्या या मुला-मुलींपैकी अनेकांची लग्न करुन, सामान्य तरूणांप्रमाणे जीवन जगण्याची इच्छा होती. रवी बापटले यांनी इतर संस्थांशी संपर्क करून, असे विवाह घडवून आणले. आतापर्यंत अकरा जोडप्यांचे विवाह केले. यातील काही जोडप्यांना निरोगी मुलंही झाली. रवी बापटले आता आजोबा बनले. हॅपी इंडियन व्हिलेज स्वावलंबी बनवणं, हे त्यांचे स्वप्न आहे.

ही कहाणी वाचायला साधी, सोपी वाटत असली तरी,तशी ती नाही. इथे पावला पावलावर संघर्ष आहे. रवी यांना मारहाण झाली, खोटे गुन्हे दाखल केले. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण मृत्युच्या छायेत वावरणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी रवींनी आयुष्य पणाला लावले. इतर कुठलीच जबाबदारी नको म्हणून, लग्न न करण्याचा निर्णय घेतला.आजपर्यंत फक्त लोकांच्या देणगीवर हा प्रकल्प सुरू आहे. म्हणूनच जगातील या पहिल्या हॅपी इंडियन व्हिलेजच्या पाठिशी जनतेचे पाठबळ उभे राहणे गरजेचेआहे.

मदतीसाठी 'सेवालय - हॅप्पी म्युझिक शो'
हासेगाव येथील ‘सेवालय’ म्हणजे एचआयव्हीग्रस्त मुलांचे आनंदवनच. या चिमुकल्यांच्या ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’ला मदतीसाठी ‘जाणिवा जपताना’ आणि ‘ट्युलिप फाऊंडेशन’ यांच्या पुढाकाराने १२ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत ‘सेवालय - हॅप्पी म्युझिक शो'चे आयोजन करण्यात आले आहे. ‘एमजीएम’च्या रुक्मिणी हॉलमध्ये सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘जाणिवा जपताना’ आणि ‘ट्युलिप फाऊंडेशन’चा हा पाचवा कार्यक्रम आहे. गेवराई (जि. बीड) येथील संतोष गर्जे यांच्या बालग्रामच्या मदतीसाठी 'स्वरानंदवन'चा आर्केस्ट्रा, अमरावतीच्या डॉ. अविनाश सावजी यांच्या प्रयास संस्थेसाठी विशेष मुलांच्या मुलाखतींचा कार्यक्रम, आणि सेवालयसाठी आतापर्यंत चॅरिटी शो घेण्यात आले. तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

मदतीचे हात हवेत
‘सेवालय’जवळच साकारणाऱ्या ‘हॅपी इंडियन व्हिलेज’च्या उभारणीसाठी ‘हॅपी म्युझिक शो’मधून जमा झालेला निधी दिला जाणार आहे. त्याचबरोबर या मुलांना शाळेत जाण्यासाठी बस विकत घेता येईल, इतका निधी उभा करण्याचे आव्हान ‘जाणिवा जपताना' आणि ‘ट्युलिप फाऊंडेशन'ने स्वीकारले आहे.  अधिक माहितीसाठी हरीश जाखेटे (9823142841), डॉ. संदीप सिसोदे (9890054518), अरविंद पाथ्रीकर (9372544783) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ‘जाणिवा जपताना’ आणि ‘ट्युलिप फाऊंडेशन’तर्फे करण्यात आले आहे.

(लेखक मानसशास्त्र तज्ज्ञ संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत)

Web Title: The sewalaya struggles to remain Happy Village 'Happy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.