पाचशे रुपयांसाठी केली हत्या; तरुणाच्या तीव्र प्रतिकारामुळे आधी हात कापला नंतर केले १८ वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:45 PM2021-04-10T16:45:56+5:302021-04-10T16:51:15+5:30

students murder for five hundred rupees in Aurangabad सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाला दारिद्र्यातून बाहेर काढण्याचे त्याचे स्वप्न होते.

murder for five hundred rupees; Due to the strong resistance of the youth, first the hand was cut off and then 18 blows were done | पाचशे रुपयांसाठी केली हत्या; तरुणाच्या तीव्र प्रतिकारामुळे आधी हात कापला नंतर केले १८ वार

पाचशे रुपयांसाठी केली हत्या; तरुणाच्या तीव्र प्रतिकारामुळे आधी हात कापला नंतर केले १८ वार

googlenewsNext
ठळक मुद्देमदतीचा बहाणा करून परीक्षा केंद्राऐवजी नेले स्मशानभूमीत लुटीस तीव्र प्रतिकार केल्याने तरुणावर केले १८ वेळा वार

औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेची अटेंडंट पदाची परीक्षा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून औरंगाबादला आलेल्या तरुणाच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात सिटी चौक पोलिसांना अवघ्या काही तासांमध्ये यश आले. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी पहाटे मध्यवर्ती बसस्थानक येथून महापालिकामागील कब्रस्तानात नेऊन विकास देवीचंद चव्हाण (वय २३, रा. हरिचा तांडा, पोस्ट, अल्हनवाडी, पाथर्डी, जि. अहमदनगर) याची क्रूरपणे निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी विकासच्या गळा, छाती आणि पोटावर शस्त्राने भोसकले आणि त्याचा कोपरापासूनचा हात धडावेगळा केला होता. 

त्याच्याजवळचे पाचशे रुपये लुटण्यासाठीच आरोपीने विकासला लिफ्ट देण्याचा बहाणा करून महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानात नेले. आरोपीचा मनसुबा लक्षात येताच विकासने त्याचा जोरदार प्रतिकार केल्यामुळे आरोपीने त्याच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारुन टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शेख शहारुख शेख फिरोज (२७, रा. जुना बाजार ) असे आरोपीचे नाव आहे. शहारुख हा मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी पळवून तो खाजगी ट्रॅव्हलला देण्याचे काम कमिशन तत्वावर करीत होता. जुनाबाजार येथे तो आईसोबत राहतो. त्याला नशेच्या गोळ्या खाण्याचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री गावाहून औरंगाबादला आलेला विकास बसस्थानकावरील फलाटावर झोपला होता. 

पहाटे पाच वाजता आरोपी शहारुखची त्याच्यावर नजर पडली. कुठे जायचे आहे, असे त्याने विकासला विचारले. परीक्षा देण्यासाठी शहरात आल्याचे आणि चिकलठाणा एमआयडीसीतील परीक्षा सेंटरवर त्याला जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने मलापण तिकडेच जायचे आहे. तुला माझ्या दुचाकीवरुन तेथे सोडतो, अशी थाप मारली. अनोळखी शहरात कुणीतरी मदतीचा हात पुढे करतो हे पाहून विकास त्याच्या सोबत जाण्यास तयार झाला. यानंतर विकासला दुचाकीवर बसवून आरोपी महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानात गेला. दुचाकी थांबवताच आरोपीने विकासला त्याच्याजवळील पैसे काढण्यासाठी धमकावले. विकासच्या खिशात पाचशे ते सहाशे रुपये होते. ही रक्कम देण्यास त्याने नकार दिला. यानंतर आरोपीने दादागिरी करीत विकासच्या खिशातील पाकिटाला हात घातला. त्याचा विरोध केल्याने त्याच्यात झटापट सुरू झाली. यावेळी आरोपी शहारुखने धारदार शस्त्राने विकासच्या छाती, पोट, गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी घाव रोखत असताना आरोपीलाही ओरखडले गेले. त्याच्या हातावर शस्त्राने वार करुन एक हात कोपरापासून अलग करीत निर्घृण हत्या करुन आरोपी पसार झाला.

हात सापडला ठाकूर बस्तीत एका घराच्या पत्र्यावर
आरोपीने विकासची हत्या करताना त्याचा हात धडावेगळा केला होता. हा हात घटनास्थळी नव्हता. एवढेच नव्हे तर काल दिवसभर शोध मोहीम राबवूनही हात सापडला नव्हता. दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळालगतच्या ठाकूरवस्ती (नयी बस्ती) येथील अब्दुल कदीर शेख यांना घराच्या पत्र्यावर हात पडलेला असल्याचे दिसले. ही बाब त्यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी हा हात जप्त केला. मांजराने मृत विकासचा हात नेला असावा, असा अंदाज पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी व्यक्त केला.

चव्हाण कुटुंबाचा आशेचा किरण
विकास चव्हाणचे कुटुंब अत्यंत गरीब. एक एकर कोरडवाहू शेती. अत्यंत गरीब कुटुंबातील विकासचा मोठा भाऊ आणि वडील ऊसतोड कामगार आहेत, तर विकासची आई १५ वर्षांपासून आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळून आहे. आईची संपूर्ण सेवा विकासच करायचा. मजुरी करून पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. विकासचा एक हात जन्मापासून कमजोर असल्यामुळे तो अपंग होता.  अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विकासने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाला दारिद्र्यातून बाहेर काढण्याचे त्याचे स्वप्न होते. यामुळे स्पर्धा परीक्षेची तो तयारी करीत शासकीय नोकरीची जाहिरात निघताच फॉर्म भरून परीक्षा देत असे. आतापर्यंत त्याने तीन वेगवेगळ्या परीक्षा दिल्याचे त्याचे चुलतभाऊ राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी वर्गणी करून दिले पैसे
विकासचा खून झाल्याचे समजल्यावर त्यांच्या वृद्ध आई, वडील आणि भावाकडे औरंगाबादला येण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे सरपंच गणेश पवार आणि अन्य गावकऱ्यांनी वर्गणी करून पैसे जमा केले आणि जीप भाड्याने घेऊन ते विकासचा भाऊ मछिंद्र यांच्यासह औरंगाबादला आले.

पोलिसांनी दिले शववाहिकेसाठी पैसे
मृत विकासचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यासाठी त्यांच्या भावाजवळ पैसे नसल्याचे पोलिसांना त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी ना नफा तत्त्वावर मृतदेह घेऊन जाण्यासाठी एक शववाहिका सामाजिक कार्यकर्ता किशोर वाघमारे यांच्या मदतीने शोधली. त्यांनी पाच हजार रुपये शववाहिनी चालकास दिले.

Web Title: murder for five hundred rupees; Due to the strong resistance of the youth, first the hand was cut off and then 18 blows were done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.