Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १,६०० जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:57 PM2019-10-12T17:57:08+5:302019-10-12T17:58:39+5:30

विधानसभा निवडणुकीत गडबड-गोंधळ कराल, तर खबरदार...

Maharashtra Election 2019: Notices to 1600 of criminal background in Aurangabad | Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १,६०० जणांना नोटिसा

Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १,६०० जणांना नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा सज्जड दम ४५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

औरंगाबाद : विधानसभा निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल १ हजार ६०० जणांना नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक काळात गडबड कराल, तर खबरदार, थेट जेलमध्ये जाल, असा इशाराच या नोटिसांच्या माध्यमातून त्यांना दिला आहे. याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून बंधपत्र घेण्यात आले.

गतवर्षी झालेल्या विविध दंगलींमुळे शहराची शांतता धोक्यात आली होती. त्यातच आता विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत आणि निर्विघ्न व्हावी, याकरिता शहर पोलिसांनी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, गत निवडणुकांमध्ये गडबड करणारे, मतपेट्या पळविणारे, मतदान केंद्रावर दहशत निर्माण केल्याचा गुन्हा असलेले, तसेच मतदारांना प्रलोभन देणारे अथवा धमकावण्याचे गुन्हे असलेल्या लोकांची यादीच पोलिसांकडे आहे. 

शिवाय हाणामारी, लुटमार आणि सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणारे आणि चोरी आदी प्र्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आयुक्तालयाच्या हद्दीतील १ हजार ६०० जणांना पोलिसांनी सीआरपीसी कलम १४९ नुसार नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक कालावधीत तुम्ही गडबड करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, तुमच्या कोणत्याही कृत्यामुळे शहराची शांतता धोक्यात आली, तर खबरदार, तुमच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, तसेच पुरावा म्हणून ही नोटीस ग्राह्य धरण्यात येईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला. पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ केला आहे. 

४५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई 
पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी ९४ जणांविरोधात सीआरपीसी ११० ची, तर सीआरपीसी १९७ ची ३५० लोकांविरोधात आणि ११ संशयितांवर सीआरपीसी १०९ कलमानुसार कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. शिवाय तडीपारी आणि एमपीडीएसारखी कडक कारवाईही पोलिसांकडून केली जात आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपारीच्या नोटिसा बजावल्याने ते भूमिगत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बंधपत्र न देणाऱ्या गुन्हेगाराला पाठविले कारागृहात
विष्णूनगर येथील रहिवासी विजय सुभाष बिरारे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याला एक लाख रुपयांचे हमीपत्र देण्याचा आदेश सहायक पोलीस आयुक्तांच्या न्यायालयाने दिला होता. मात्र, हमीपत्र न देऊ शकल्याने बिरारेला हर्सूल कारागृहात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019: Notices to 1600 of criminal background in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.