कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कमी ढग व फ्रिक्वेन्सीचा अडसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:29 AM2019-08-10T11:29:06+5:302019-08-10T11:57:13+5:30

पाण्याची, पिकांची तरी चिंता मिटावी

Low clouds and frequency barrier to artificial rain experiments in Marathwada | कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कमी ढग व फ्रिक्वेन्सीचा अडसर 

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कमी ढग व फ्रिक्वेन्सीचा अडसर 

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात पहिल्याच दिवशी प्रयोगाला अडसर‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारवर खेळ  

औरंगाबाद : पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असताना जायकवाडी धरणाचा अपवाद सोडला, तर मराठवाड्यातील धरणे अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता  चिकलठाणा विमानतळावरून ख्याती वेदर मॉडिफिकेशनच्या विमानाने उड्डाण घेतले खरे. मात्र, विरळ ढग आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने  कृत्रिम पाऊस न पाडताच अवघ्या ४५ मिनिटांत विमान खाली उतरले. 

दुष्काळग्रस्त भागात ५२ दिवस कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत.  हिंगोली जिल्ह्यात  ४0 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान झाले आहे. तर बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे अजूनही कोरडेच आहेत. ऐन पावसाळ्यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्व १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक आहेत. जालना जिल्ह्यात सरासरीच्या २५० मिलिमीटर (३५ टक्के) एवढा कमी पाऊस झाला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात ४२.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

काय म्हणतात या तंत्रज्ञानाला? 
क्लाऊड सीडिंग टेक्नॉलॉजी, असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. रेन शेडिंग एरियामध्ये सोडिअमच्या नळकांड्या विमानाच्या साहाय्याने हवेत सोडण्यात येतात. ढगांच्या गर्दीत सोडिअमचा धूर वेगवान हालचाल निर्माण करतो. ढग हलके होऊन त्याच भागात बरसतात.

४८ सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’ विमानाला दोन्ही बाजूंनी बसविले.दुपारी एक वाजता शास्त्रज्ञांसह विमानाने औरंगाबाद पश्चिमेला उड्डाण भरले. ढगांची गर्दी नसल्याने आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने दोन वाजेच्या सुमारास विमान खाली उतरले. ढगांची गर्दी पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल.

असा पडतो कृत्रिम पाऊस 
‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’, ढगांची गर्दी तपासून त्या दिशने ‘एरोसोल्स’(नळकांड्या) सोडण्यात येतात. ‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारच्या साहाय्याने ढगांचे स्कॅनिंग केले जाते. त्या स्कॅनिंग इमेजमध्ये (फोटो) किती पाणी आहे, पडण्याची क्षमता कशी आहे, किती किलोमीटरच्या रेंजमध्ये ते पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साहाय्याने नळकांड्या ढगात सोडण्यात येतात आणि ते ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरी होऊन बरसतात. जगभरामध्ये तीन ते चार देशांमध्ये या महागड्या तंत्राने पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.

‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारवर खेळ  
‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारचा नेटवर्क एरिया २५० कि़मी.पर्यंतच्या ढगांपर्यंत आहे. त्यापुढे ४०० कि़मी.पर्यंत हे रडार ढगांतील पाण्याचा शोध घेण्याची क्षमता ठेवते. रडारच्या साहायाने ढगांचे छायाचित्रण केले जाते. स्केल रिफ्रेक्शन्सनुसार ढगांची दिशा कळते. त्या डाटाचे स्कॅनिंग करून त्याचे छायाचित्र हवामान खाते व इतर विभागाला पाठविले जाते. तेथील तज्ज्ञांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर विमानातील पायलट, रडारतज्ज्ञ यांच्या मदतीने ढगांमध्ये सोडिअमच्या नळकांड्या सोडण्यात येतात.

मंत्र्यांना दिसले विदर्भात ढग
मराठवाड्यात ‘ट्रायल रन’च्या अनुषंगाने  विमानाचे शुक्रवारी उड्डाण होत नाही तोवरच मंत्रालयातून एका मंत्र्याने विमानतळावर एका शास्त्रज्ञाला फोनवरून विदर्भात ढग असून तिकडे उड्डाण करण्याच्या सूचना केल्या! सी-डॉप्लर रडार अजून कार्यान्वित झालेले नाही, अक्षांश, रेखांश सेटिंग होत नाही, तोवरच विदर्भाकडे प्रयोग करण्याच्या सूचना आल्याने शास्त्रज्ञही गांगरून गेले.

Web Title: Low clouds and frequency barrier to artificial rain experiments in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.