Karnapura Yatra, an attraction of Aurangabad, canceled | औरंगाबादचे आकर्षण असणारी कर्णपुरा यात्रा रद्द

औरंगाबादचे आकर्षण असणारी कर्णपुरा यात्रा रद्द

औरंगाबाद : कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा मात्र कोरोनामुळे रद्द झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. नवरात्र उत्सवासाठी शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठीची खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्णपुरा येथील तुळजाभवानीचे मंदिर शहर व जिल्ह्यातील ग्रामदैवत आहे. या मंदिराला मोठा इतिहास असून दरवर्षी नवरात्रात लाखो भाविक  यात्रेत  सहभागी होत असतात. यात्रेतून मोठी आर्थिक उलाढाल तर होतेच पण त्यासोबतच मनोरंजनासाठी यात्रेत विविध राज्यांतील व्यापारी आपली दुकाने, खेळणी, हॉटेल्स थाटत असतात. 

या पार्श्वभुमीवर यंदाचा नवरात्रोत्सव कसा असणार, याविषयी सांगताना कर्णपुरा संस्थानचे अध्यक्ष आ. अंबादास दानवे यांनी सांगितले की मंदिरातील पूजा व इतर विधी हे सर्व नियम पाळून होतील. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून विजया दशमीपर्यंतच्या ज्या धार्मिक परंपरा आहेत, त्या शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पूर्ण करण्यात येतील.

नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या गृहविभागाच्या सूचना आहेत.  तसेच गरबा, दांडियाचे कार्यक्रम यंदा होणार नाहीत.  विजया दशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात याव्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांना बोलावू नये, विसर्जन मिरवणूक, दैनंदिन धार्मिक कार्यक्रम याबाबत शासनाने मार्गदर्शक नियम घालून दिले आहेत.

Web Title: Karnapura Yatra, an attraction of Aurangabad, canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.