हलक्या प्रतीच्या कागदामुळे ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 04:02 PM2019-11-08T16:02:56+5:302019-11-08T16:06:50+5:30

हलक्या प्रतीच्या कागदामुळे दोन वर्षांत खराब झाल्या नोटा

Due to the lighter paper, the torn notes of of 500 rs increased | हलक्या प्रतीच्या कागदामुळे ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा वाढल्या

हलक्या प्रतीच्या कागदामुळे ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा वाढल्या

googlenewsNext
ठळक मुद्देपरवानाधारक व्यापारी कमिशनवर बदलून देताहेत नोटा

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने चलनात ५०० रुपयांची नोट आणली. मात्र, हलक्या कागदामुळे अवघ्या ३ वर्षांत या नोटा खराब होऊ लागल्या आहेत. हाताळून हाताळून या नोटा फाटू लागल्या आहेत. अशा फाटक्या नोटा घेऊन नागरिक बँकांमध्ये येत आहेत. आठवड्याला १०० पेक्षा अधिक ग्राहक अशा नोटा घेऊन बँकांमध्ये येत आहेत. अति फाटलेल्या नोटा ज्या बँका घेत नाहीत, अशा नोटा परवानाधारक व्यापारी कमिशनवर बदलून देत आहेत. 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी १,००० रुपये व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवीन ५०० रुपये व २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. ५०० रुपयांच्या नोटेचा आकार ६६ एमएम बाय १५० एमएम एवढा ठेवण्यात आला आहे. मात्र, ५०० रुपयांच्या नवीन नोटा हातात पडताच त्यावेळी नागरिकांनी या नोटा हलक्या प्रतीच्या कागदापासून तयार करण्यात आल्या असल्याचा आरोप केला होता, तसेच हाताळून हाताळून या नोटा लवकर खराब होतील, असेही म्हटले होते. 

नवीन नोटा चलनात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिकांचे म्हणणे आता सत्य ठरत आहे. कारण, बँकांकडे मोठ्या संख्येने ५०० रुपयांच्या नवीन खराब नोटा ग्राहक आणून देत आहेत. शहरात सर्व बँकांमध्ये मिळून दररोज १०० पेक्षा अधिक ग्राहक ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा आणून देत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात २ तुकडे असलेल्या नोटा, हाताळून खराब झालेल्या नोटा, रंग फिक्कट झालेल्या नोटा, एवढेच नव्हे, तर ३ ते ४ तुकडे झालेल्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. 

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या दूध डेअरी करन्सी चेस्टमध्ये दर शुक्रवारी अशा नोटा बदलून दिल्या जात आहेत. याच बँकेच्या शाहगंज येथील करन्सी चेस्टमध्ये दररोज ५०० रुपयांच्या १३ ते १५ खराब नोटा घेऊन ग्राहक येत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. बँक दोन तुकडे असलेली नोट स्वीकारते; पण ती नोट चिकटवून दिलेली पाहिजे. तीन तुकडे असलेली किंवा नंबरवरच खराब झालेली किंवा नंबरवरच तुकडा पडलेली नोट बँक स्वीकारत नाही, असेही त्यांनी नमूद केले. मागील ६ महिन्यांत ५०० रुपयांच्या फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून आणून देण्याचे प्रमाण वाढल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तीन तुकड्यांवरील नोटा कमिशन एजन्टकडे 
तीन तुकड्यांवरील नोटा बँका स्वीकारत नाहीत. अशा नोटा अखेरीस ग्राहक शहरातील कमिशन एजन्टकडे नेत आहेत. कमिशन एजन्टने सांगितले की, दररोज ५०० रुपयांच्या २० ते २५ नोटा ग्राहक आणत आहेत. या नोटा ३० टक्के कमिशन घेऊन बदलून दिल्या जात आहेत. येथून या फाटक्या नोटा मुंबईत रिझर्व्ह बँकेसमोर बसलेल्या कमिशन एजन्टकडे पाठविल्या जातात. ते कमिशन एजन्ट रिझर्व्ह बँकेत नोटा जमा करीत असल्याचे कमिशन एजन्टने सांगितले. 

५ लाखांच्या बनावट नोटा 
बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारात ३ लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आहेत, तर २ लाख रुपयांच्या बनावट नोटा बँकांमध्ये जमा झालेल्या आहेत. यामुळे बँकांमधील अधिकाऱ्यांनी नोटा स्वीकारताना संपूर्ण काळजी घ्यावी, असेही सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये येणाऱ्या बंडलमध्येही दोन ते तीन बनावट नोटा येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. व्यापारी व ग्राहकांनीही दैनंदिन व्यवहारामध्ये नोटा तपासून घ्याव्यात, असे आवाहनही बँक अधिकाऱ्यांनी केले. 

Web Title: Due to the lighter paper, the torn notes of of 500 rs increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.