Don't believe the rumors; eye of police on all the elements | अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांची सर्व घटकांवर नजर
अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांची सर्व घटकांवर नजर

औरंगाबाद : अयोध्येतील त्या जागेसंबंधी खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी जाहीर होण्याच्या शक्यतेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. मिश्र समाज वसाहतींमधील हॉटेल रात्री ११ नंतर बंद करण्यावर भर दिल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी विविध धर्मगुरू, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शहरात शांतता राखण्यासाठी आवाहन केले आहे. निकालाचे कोणतेही पडसाद शहरात पडून शांतता धोक्यात येणार नाही, याबाबत पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ३ पोलीस उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, असे २०० अधिकारी, ३ हजार ५०० कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, गृहरक्षक दलाचे जवान शहर पोलिसांच्या मदतीला आहेत. पोलिसांनी गस्त वाढविली आहे. 

संवेदनशील वसाहतींमध्ये पॉइंट
पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले की, शहरातील संवेदनशील आणि मिश्र समाज वसाहतीत पोलिसांनी फिक्स पॉइंट लावले आहेत. १९९२ च्या दंगलीतील आरोपी असलेले आणि आताही सक्रिय असलेल्या लोकांना नोटिसा बजावून गैरकृत्य केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे  बजावण्यात आले आहे. शहरातील गर्दीचे ठिकाण, रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणची बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून सतत तपासणी केली जात आहे. शहरातील विविध हॉटेल आणि लॉजची  तपासणी केली जात आहे. 

बाहेरगावी जाण्याचे बेत रद्द
या निकालाच्या पार्र्श्वभूमीवर बाहेरगावी जाण्याचा बेत नागरिकांनी रद्द केला, तसेच बाहेरगावी असलेल्या नागरिकांनी आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचे अनेकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका -पोलीस आयुक्त 
धार्मिक आणि जातीय दरी निर्माण करणा-यांवर पोलिसांचे लक्ष असून, सोशल मीडियावरील विविध ग्रुप, फेसबुकवरही पोलिसांची नजर आहे. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ व्हायरल करणाºयांवर भा.दं.वि. १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Don't believe the rumors; eye of police on all the elements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.