'Be it a collector or someone, do what you want'; car driver threatens the district collector of Aurangabad | 'कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचे ते करा'; भररस्त्यात जिल्हाधिकाऱ्यांना कारचालकाची अरेरावी

'कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचे ते करा'; भररस्त्यात जिल्हाधिकाऱ्यांना कारचालकाची अरेरावी

ठळक मुद्देआंबेडकर नगर चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या कारसमोर रिक्षा आणि कार चालक आपसात हाणामारी करीत होते.जिल्हाधिकाऱ्यांनी कारमधून उतरून कार चालकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : रस्त्यावर भांडण करून वाहतूकीला अडथळा आणू नका असे सांगणाऱ्या  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि त्यांच्या अंगरक्षकाला एका कारचालकाने अरेरावीची भाषा वापरली. एवढेच नव्हे तर अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२० वाजेच्या सुमारास जळगांव रोडवरील आंबेडकरनगर चौकात घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदवून सिडको  पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शशांक अशोक वाघ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की रविवारी सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे कलाग्राम येथे मतपेट्याची पाहणी करून कारने  कार्यालयाकडे परत जात होते. यावेळी त्यांचा अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गणपती इंगळे त्यांच्यासोबत होते. आंबेडकर नगर चौकात त्यांच्या कारसमोर रिक्षा आणि कार रस्त्यात उभी होती. दोन्ही वाहनाचे चालक आपसात हाणामारी करीत होते. यामुळे चालकाने कार उभी केली आणि अंगरक्षक इंगळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले.

'कारमध्ये जिल्हाधिकारी, आहेत रस्त्यावर भांडू नका', असे त्यांनी दोघांना सांगितले असता रिक्षाचालक तिथून निघून गेला. तर कारचालक शशांक हा इंगळे त्यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. एवढेच नव्हे तर त्याने इंगळे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे पाहून जिल्हाधिकारी कारमधून उतरले आणि त्यांनी कार चालक शशांकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने, 'तुम्ही कलेक्टर असो अथवा कोणी, तुम्हाला काय करायचे करून घ्या?' असे उर्मट बोलून तो कार घेऊन तेथून निघून गेला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंगरक्षक इंगळे यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी केली रात्री अटक
आरोपी शशांक हा आरटीओ अधिकार्‍याचा तरुण मुलगा आहे. तो उस्मानपुरा परिसरात व्यायाम शाळा चालवितो. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होताच सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: 'Be it a collector or someone, do what you want'; car driver threatens the district collector of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.