The age of the accused in the sex racket was hidden,accused face covered | सेक्स रॅकेटमधील आरोपीचे वय लपविले, चेहरेही झाकले
सेक्स रॅकेटमधील आरोपीचे वय लपविले, चेहरेही झाकले

ठळक मुद्देआरोपीचे वय दाखविले २९ वर्षे  गुन्हे शाखेच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील राजेशनगरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने शनिवारी रात्री पर्दाफाश केला. तेव्हा तेथे एका मॉलचा प्रमुख हाती लागला. त्याला वाचविण्यासाठी काही लोकांनी फोनाफोनी केली. मात्र, पोलिसांकडून कारवाई पूर्ण झाल्याचे उत्तर मिळाल्याने आता काहीतरी मदत करा, असे सांगण्यात आले, तेव्हा पन्नाशीतील त्या आरोपीचे वय २९ करण्यात आले. एवढेच नव्हे, तर किरकोळ गुन्ह्यातील आरोपींचे उघड्या चेहऱ्याचे छायाचित्र देणाऱ्या पोलिसांनी मात्र या आरोपींचे चेहरे माध्यमात येऊ नये, याकरिता खबरदारी घेतली आणि  लॉकअ‍ॅपमधून बाहेर काढताना त्यांना चेहरे झाकण्यासाठी टॉवेल देण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी हे केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

औरंगाबादेत हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हे शाखेचा छापा

बीड बायपास परिसरातील राजेशनगर आणि यशवंतनगर येथील वेगवेगळ्या घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने शनिवारी पर्दाफाश करून ४ तरुणींची मुक्तता केली. शहरातील एका मॉलच्या प्रमुखासह चार ग्राहकांना विचित्र अवस्थेत पकडण्यात आले. दोन आंटी आणि दोन दलालांना अटक करण्यात आली. या सेक्स रॅकेटसाठी कोलकाता, हैदराबादसारख्या मोठ्या शहरांतून तरुणी येथे आणण्यात आल्या होत्या. मानवी देहव्यापाराच्या या मोठ्या गुन्ह्यात पकडलेल्या मॉल प्रमुखाला वाचविण्यासाठी काही लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले. मात्र, कारवाई पूर्ण झाल्याचे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे काहीतरी करा, त्या व्यक्तीची बदनामी टाळा, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी पन्नाशीतील त्या आरोपीचे वय केवळ २९ दाखविले, तसेच त्याला लॉकअपमधून बाहेर काढताना टॉवेल, रुमाल देऊन त्यांचे चेहरे झाकून न्यायालयात नेण्यात आले. सामान्य आरोपींप्रमाणे या गुन्ह्यातील आरोपींसोबत पोलिसांनी फोटोसेशन केले नाही.  

ग्राहक की देहव्यापाराचे म्होरके
पोलिसांनी कुंटणखाण्यावर धाड टाकली तेव्हा तेथे ६ पुरुष, २ आंटी आणि ४ तरुणी होत्या. एवढेच नव्हे, तर तेथे अवैध दारूसाठाही मिळाला होता. ते ग्राहक होते की, देहव्यापाराचे म्होरके होते हे स्पष्ट होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांची आम्हाला पोलीस कोठडी नको, त्यांना न्यायालयीन कोठडी द्या, अशी विनंती न्यायालयाला केली. नंतर या कथित ग्राहकांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

Web Title: The age of the accused in the sex racket was hidden,accused face covered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.