नेक्स्ट लेव्हल मॉलमधील ओपन टेरेसच्या सुरक्षेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:55+5:30

शैक्षणिक अपयशातून नैराश्याच्या भावनेतून आत्महत्येच्या इराद्यानेच रूपाली नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये पोहोचली. तिने टेरेसच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेतली. एवढे घडेपर्यंत तिच्याकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. संचालक वरुण मालू यांच्या अधिकारक्षेत्रातील या मॉलच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर शानदार बार, रेस्टॉरंट व आकर्षक सभागृह आहे.

What about the safety of the open terrace at Next Level Mall? | नेक्स्ट लेव्हल मॉलमधील ओपन टेरेसच्या सुरक्षेचे काय?

नेक्स्ट लेव्हल मॉलमधील ओपन टेरेसच्या सुरक्षेचे काय?

Next
ठळक मुद्देउपाययोजनांची वानवा : रूपालीचे आत्महत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गर्ल्स हायस्कूल चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉलच्या पाचव्या माळ्यावरील खुल्या टेरेसच्या भिंतीवर चढून रूपाली बुंधाडेने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे अत्याधुनिक सुविधांंच्या आवरणाखाली सुरक्षिततेच्या उपाययोजनांची वानवा उघड झाली आहे. मॉलच्या संचालकांनी येथे सुरक्षेसाठी उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न या घटनेच्या अनुषंगाने उपस्थित झाला आहे.
शैक्षणिक अपयशातून नैराश्याच्या भावनेतून आत्महत्येच्या इराद्यानेच रूपाली नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये पोहोचली. तिने टेरेसच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेतली. एवढे घडेपर्यंत तिच्याकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. संचालक वरुण मालू यांच्या अधिकारक्षेत्रातील या मॉलच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर शानदार बार, रेस्टॉरंट व आकर्षक सभागृह आहे. ओपन टेरेसच्या मोठ्या जागेत आलीशान खुर्च्यांची सोय ग्राहकांसाठी आहे. कुणीचेही तेथे आगमन होताच चौकशी होते. काय हवे, कुठे जायचे आहे, असे विचारले जाते. तथापि, मॉलच्या पाचव्या मजल्यावरून पोहोचलेल्या रूपालीला कुणीच हटकले का नाही? विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी मॉलचे संचालक वरुण मालू यांनी मॉलच्या पाचव्या मजल्यावर जाण्यास पत्रकारांना मज्जाव केला आणि ही जागा माझ्या अधिकारक्षेत्रात आहे, असे म्हटले होते. कुणाला आत येऊ द्यायचे अन् कुणाला नाही, हे मीच ठरविणार, असे भाष्यही केले होते.
रूपालीची आत्महत्या ही अकल्पित घटना असली तरी मॉलवरील टेरेसच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट आहे. मॉलच्या पाचव्या मजल्यावर असणाऱ्या अप अ‍ॅन्ड अबाऊ नावाने बार अ‍ॅन्ड रेस्टारंट, मेजवानी रूम आहे. बारमध्ये येणारे ग्राहक मद्यपान करून ओपन टेरेस परिसरातील खुर्च्यांवर बसतात.
प्रत्येक ग्राहकाच्या मनस्थितीचा अंदाज घेता येऊ शकत नाही. तथापि, आत्महत्येच्या इराद्याने तेथे कुणी आल्यास तो ओपन टेरेसच्या तीन ते चार फुटाच्या संरक्षण भिंतीवरून कधीही उडी घेऊ शकतो. एखादेवेळी ग्राहकांचे वाद-विवाद झाल्यास धक्काबुक्कीत कुणी खाली पडू शकते, याचा पूर्वानुमान घेण्याची जबाबदारी मॉल संचालकाची आहे. त्यानुसार त्यांनी ओपन टेरेसच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आधीच करायला हव्या. आता जर त्या होणार असतील, तर त्यासाठी रूपालीने नाहक जीव गमावला असे म्हणावे लागेल. यासंदर्भात पोलीस प्रशासन मॉल संचालकाविरुद्ध काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेक्स्ट लेव्हल मॉलच का निवडला?
शिराळा येथील रहिवासी रूपालीने आत्महत्येसाठी नेक्स्ट लेव्हल मॉलच का निवडला, ही बाब चर्चिली जात आहे. रूपालीच्या मृतदेहाचे रविवारी शवविच्छेदन पार पडले. तिच्या हृदयाला, डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश्री चंदापुरे व पोलीस शिपाई पंकज चव्हाण यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. रूपालीच्या पार्थिवावर शिराळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आत्महत्येपूर्वी ती रिना नामक मैत्रिणीकडे होती. गाडगेनगर पोलिसांनी रिनाचे बयाण नोंदविले. रूपाली ही ४ आॅक्टोबर रोजी ‘न्यू कमर्स’च्या पार्टीत सहभागी होती. याच नेक्स्ट लेव्हल मॉलच्या अप अँड अबाऊ रेस्टॉरंटमध्ये ती पार्टी झाली. सायंकाळी ७ वाजता ती रिनाकडे गेली. सकाळी ८ वाजता तिच्या घरून गावी जाण्यासाठी निघाली. मात्र, मॉलमध्ये पोहोचून आत्महत्या केली. तिच्या मनात वर्षभरापासून आत्महत्येचा विचार घोळत होता, असे चिठ्ठीवरून स्पष्ट झाले तरी आत्महत्येसाठी हीच जागा का निवडली, यामागचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

Web Title: What about the safety of the open terrace at Next Level Mall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू