जलकुंभ बांधले, पाणी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:12+5:30

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परंतु यावर उपाययोजना करताना कामांची गती अतिशय संथ आहे. पाणीटंचाईच्या कामाबाबत यंत्रणा पाहिजे तशी सक्रिय नसल्याचे सांगत झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाईचे कामे करताहेत की केवळ कागदी घोडेच नाचवत आहात, असे खडेबोल सुनावत मला कामासोबतच त्याची उपयोगिता पाहिजे.

Water tank built, where is the water? | जलकुंभ बांधले, पाणी कुठे ?

जलकुंभ बांधले, पाणी कुठे ?

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : पाणी टंचाईचा मुद्दा, अधिकारी टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावखेड्यांत जलकुंभ साकारण्यात आले. मात्र, या जलकुंभात पाणीच कुठे आहे. पाणी नाही तर जलकुंभाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करून पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना टार्गेट केले. जिल्हा परिषदेत गुरूवारी पार पडलेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत पाणीटंचाईचा मुद्दा तीव्रतेने गाजला.
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परंतु यावर उपाययोजना करताना कामांची गती अतिशय संथ आहे. पाणीटंचाईच्या कामाबाबत यंत्रणा पाहिजे तशी सक्रिय नसल्याचे सांगत झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाईचे कामे करताहेत की केवळ कागदी घोडेच नाचवत आहात, असे खडेबोल सुनावत मला कामासोबतच त्याची उपयोगिता पाहिजे. अन्यथा कुणाचाही मुलाहिजा केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. चांदूर बाजार तालुक्यातील परसोडा, बेसखेडा व इतर अनेक गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी जलकुंभ काही वर्षांपूर्वी बांधले. मात्र, त्यातून अद्यापही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे ते जलकुंभ शोभेची वास्तू आहे काय, असा दम भरत पाणीपुरवठा विभागाला कामकाजातील मरगळ झटकून कामे मार्गी लावण्याचे निर्देश बबलू देशमुख यांनी दिले. मोगरा येथे पाणी उदभव खोदण्यापूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली. या मुद्यावरही अध्यक्षांनी पाणीपुरवठा विभागाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले. यावेळी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांना मजीप्राकडून कमी व काही गावांत पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा सभापती बाळासाहेब हिंगणीकर, विठ्ठल चव्हाण आदींनी उपस्थित केला.
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार संपर्क साधून काहीच कार्यवाही होत नसल्याचे सभागृहात सांगितले. दरम्यान अध्यक्षांनी मजीप्राचे अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. याशिवाय गौरी देशमुख यांनी रघुनाथपूर येथील सिंचन तलाव, धोत्रा येथील तलावामुळे शेतकऱ्यांचा बंद झालेला शेतीचा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली. याबाबत योग्य कार्यवाहीचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सदस्या पूजा हाडोळे, गौरी देशमुख, पार्वती काठोळे, वासंती मंगरोळे, अनिता मेश्राम, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, जलसंधारण अधिकारी प्रमोद तलवारे, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकणी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Water tank built, where is the water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.