विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:33 IST2025-10-17T16:26:23+5:302025-10-17T16:33:38+5:30
चांदूर रेल्वेत प्रेयसीचा गळा आवळला : रचला आत्महत्येचा बनाव

Vidarbha is shaken! Pooja's relationship with her husband is broken, she has a love affair with her ex-boyfriend Shubham again and it ends in a terrible end
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : शहरातील डांगरीपुरा येथील तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि नंतर तिचे प्रेत रेल्वे पुलाजवळ टाकल्याचे गुरुवारी उघड झाले. त्यापूर्वी तिने घटस्फोटाच्या केसमुळे रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली असावी, अशा तक्रारीवरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभम विठ्ठलराव हटवार (२८, रा. डांगरीपुरा) याला अटक केली. मृताचे नाव पूजा (२५, रा. डांगरीपुरा) असे आहे.
मृत पूजाची लग्नापूर्वी शुभमशी घट्ट मैत्री होती. या नात्याने पुढे प्रेमाचे रूप घेतले. यादरम्यान पूजाचे लग्न शिराळा येथे झाले. मात्र, पतीच्या सततच्या त्रासामुळे ती माहेरी चांदूर रेल्वे येथे परत आली. दरम्यान, शुभमचेही लग्न झाले होते. एकाच परिसरात असल्याने दोघांचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. या काळात पूजा शुभमवर लग्नाचा तगादा लावत होती. त्यातून शुभम मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला. अखेर त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला.
याप्रकरणी शुभम व त्याच्या पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसडीपीओ अशोक थोरात, एलसीबीप्रमुख किरण वानखडे, येथील ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नंदलाल लिंगोट, एलसीबी पीएसआय मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, सचिन मिश्रा, नितीन शेंडे, मनोज घवळे आदींनी केले.
खुनाचा कट थरारक
शुभमने पूजाला १५ ऑक्टोबर रोजी रात्री पत्नी गावी गेल्याचे सांगून घरी बोलावले. घरातच शुभमने पूजाचा गळा आवळून खून केला. मृतदेह लपवण्यासाठी त्याने तिचे प्रेत उचलून स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलाजवळ नेले. शरीरावरून रेल्वे गाडी गेल्याने तिचे तुकडे झाले.
भावाच्या तक्रारीवरून गुन्हा उघड
पूजा १५ ऑक्टोबर रोजी सकाळपासून घराबाहेर असल्याने तिच्या भावाने चांदूर रेल्वे ठाण्यात तक्रार नोंदवली. १६ ऑक्टोबरला सकाळी बहिणीचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचे त्याला समजले. शुभमने पत्नीच्या मदतीने दोरीने पुजाचा गळा आवळून तिला ठार केले. तिचे शव पोत्यात बांधून मोपेडच्या मधात ठेवले. शुभम व त्याची पत्नी ते शव घेऊन रेल्वे पुलाखाली पोहोचले. तिने आत्महत्या केली, असे उघड व्हावे, असा त्यामागचा कयास होता. मात्र तपासात बिंग फुटले. या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यासह पुरावा नष्ट करण्याचे कलमदेखील समाविष्ट करण्यात आले आहे.