कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 03:12 PM2022-03-27T15:12:04+5:302022-03-27T15:19:19+5:30

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या आतील, बाहेरील, छतावरील कोरीव नक्षीकाम हे अजिंठा-वेरूळ लेण्यातील कोरीव कामाशी साधर्म्य सांगणारे आहे.

vidarbha famous no roof temple : the ancient Anandeshwar temple Lasur | कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना

कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना

googlenewsNext

धनंजय धांडे 

अमरावती : अकोला मार्गावर लासूरचा बसथांबा लागतो. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या छोट्याशा खेडेगावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारी प्राचीन वास्तू या गावात शेकडो वर्षांपासून एखाद्या इतिहासपुरुषाप्रमाणे धीरोदात्तपणे उभी आहे. ती म्हणजे हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेले प्राचीन आनंदेश्वर शिवमंदिर. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या आतील, बाहेरील, छतावरील कोरीव नक्षीकाम हे अजिंठा-वेरूळ लेण्यातील कोरीव कामाशी साधर्म्य सांगणारे आहे.

आनंदेश्वर शिवालयाची उभारणी इ.स. बाराव्या शतकात देवगिरीच्या यादववंशीय राजाच्या काळात झाल्याची माहिती मंदिर अभ्यासक सांगतात.

साधारणत: साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेले अतिभव्य बांधकामाचे हे दगडी शिल्प दुरून एखाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे भासते. स्वस्तिक चिन्हाच्या आकारात बांधकाम आहे. ऐतिहासिक मंदिरांच्या उलट या मंदिराला कळस नाही. अभ्यासकांचे मते, ते कदाचित मंदिराच्या आतील भागत व सभामंडपात भरपूर प्रकाश यावा, या हेतूने मंदिरावर कळसाची उभारणी केली नसावी.

मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना

उत्तरमुखी मंदिराचा आकार अष्टकोनी आहे. दक्षिण भाग हा चिरेबंदी दगडी भिंतीने बंद असून पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेला खिडक्या व दरवाजे आहेत. दर्शनी भागाकडून या वास्तूकडे बघितल्यास एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्याचा भास होतो. मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा दगडी ओटा (पार) बांधलेला आहे. मंदिराचे बांधकाम मोठ्या दगडी फाड्या चढत्या-उतरत्या क्रमात एकावर एक रचून, पकड घट्ट रहावी याकरिता प्रत्येक फाडीच्या टोकाला खड्डे करून त्यामध्ये लोखंडी कांबा बसविण्यात आल्या. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याचे कोनातील माप ९० अंशाचे भरते.

नक्षीदार कोरीव काम 

पाच पदरी दगडी चौकट असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच भव्य, खुला सभामंडप दृष्टीस पडतो. बारा खुले आणि सहा भिंतीत बंदिस्त असणारे दगडी स्तंभ या मंदिराला भक्कम आधार देतात. प्रत्येक खांबावर कोरीव, कातीव असे शिल्पकाम आढळते. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीवर विविध भौमितिक आकार, लता-वेली, फुले-फळे यांची वेल-बुट्टी शैलीत कोरीव कलाकुसर आहे. मंदिराची एकंदर रचना ही शिल्पकला व स्थापत्यकला याचा वैशिष्ट्यपूर्व संगम साधणारी आहे. मंदिराच्या प्रत्येक दालनाला नक्षीदार खिडक्या आहेत. पूर्व-पश्चिम दिशेने हिरवीगार वनश्री, दक्षिणेला जीवनदायी पूर्णा नदी या विहंगम पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक वास्तूभोवती असलेल्या प्रशस्त प्रदक्षिणा मार्गावर उभे राहिल्यास आसपासची टुमदार गाव-खेडी व निसर्गसौंदर्य मानवी मनाला निश्चितपणे भुरळ घालतात.

आत्मशुद्धी, मनशांतीचे प्रतीक 

शिवालयातील गाभाऱ्यात जागृत असे आनंदेश्वर शिवलिंगाच्या रूपाने स्थापित आहे. त्यावर ताम्र धातूची नागप्रतिमा विराजमान आहे. दैनंदिन पूजेसह या मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा म्हणजे लासूर ग्रामवासीयांकरिता दिवाळीच असते.

चिंता, काळजी आणि काही अपेक्षा....

पूर्णानदीच्या पुरामुळे वास्तूला धोका पोहोचू नये म्हणून संरक्षक भिंतीचे बांधकाम शासनाच्यावतीने करण्यात आले. मात्र, कालौघात मंदिरावरील नक्षीकाम लुप्त होत आहे. भेगा मोठ्या होत आहेत. काही कोनाड्यामधील मूर्ती नाहीशा झाल्या आहेत. या वास्तूची देखभाल भारतीय पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद यांच्याकडे आहे.

Web Title: vidarbha famous no roof temple : the ancient Anandeshwar temple Lasur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.