‘इन्स्टा’ची ओळख पडली महाग; अर्ध्या रात्री ‘ती’ची लैंगिक छळवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2023 22:11 IST2023-06-23T22:11:03+5:302023-06-23T22:11:38+5:30
Amravati News येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची अर्ध्या रात्री लैंगिक छळवणूक करण्यात आली. ‘त्या’ अल्पवयीन मुलाशी तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.

‘इन्स्टा’ची ओळख पडली महाग; अर्ध्या रात्री ‘ती’ची लैंगिक छळवणूक!
अमरावती : येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची अर्ध्या रात्री लैंगिक छळवणूक करण्यात आली. ‘त्या’ अल्पवयीन मुलाशी तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ती ओळख तिच्या छळवणुकीला कारणीभूत ठरली. २२ जून रोजी रात्री १ ते ४ या कालावधीत गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत तो अश्लाघ्य प्रकार घडला. याप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २२ जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास एका विधिसंघर्षित बालकाविरुद्ध बलात्कार, विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, यातील पीडित तक्रारदार अल्पवयीन मुलगी व विधिसंघर्षित बालकाची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर इन्स्टावर चॅट करून त्याने एप्रिल महिन्यात तिच्याशी संपर्क केला. ती इन्स्टाग्रामवर चॅट करत त्याच्याशी एकदा बोलली. दरम्यान, मे महिन्यात तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केले. दरम्यान, पीडिता ही एकटी कॉम्प्युटर क्लासला जात-येत होती. त्यामुळे त्या विधिसंघर्षित बालकाने तिचा ट्युशन क्लासचा परिसर गाठला. तो तेथे बसला राहायचा. त्याने तिचा सतत पाठलागदेखील केला.
नेमके घडले काय?
२२ जून रोजी रात्री एकच्या सुमारास ती अल्पवयीन मुुलगी पाणी पिण्यासाठी उठली. घरातील खिडकीजवळ तिला सतत पाठलाग करणारा तो विधिसंघर्षित बालक दिसला. त्यामुळे नेमका कोण, हे पाहण्यासाठी तिने दार उघडले. त्याने तिला माझ्यासोबत माझ्या घरी चल म्हणत घराबाहेर पडण्यास बाध्य केले. तिला तो स्वत: राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग करीत तिची लैंगिक छळवणूक केली. पहाटे ३:३० ते चारच्या दरम्यान त्याने तिला तिच्या घराच्या जाणाऱ्या दिशेने नेले. त्यानंतर ती भेदरलेल्या स्थितीत घरी पोहोचली.
आईला सांगितली आपबीती
अडीच तीन तासानंतर कशीबशी घरी पोहोचल्यानंतर तिने धाडस एकवटून ती बाब आईला सांगितली. त्या प्रकारामुळे तिचे कुटुंबीय नखशिखांत हादरले. त्यांनी मुलीला धीर देत गुरुवारी सकाळी गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रेखा लोंढे या पुढील तपास करीत आहेत. त्या विधिसंघर्षित बालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.