सुटीच्या दिवशी कार्यरत पोलिसांना तुटपुंजे वेतन

By Admin | Updated: December 18, 2014 22:47 IST2014-12-18T22:47:40+5:302014-12-18T22:47:40+5:30

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे.

Slightly paid salaries to the police working on the holidays | सुटीच्या दिवशी कार्यरत पोलिसांना तुटपुंजे वेतन

सुटीच्या दिवशी कार्यरत पोलिसांना तुटपुंजे वेतन

चांदूरबाजार : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे पोलीस दलात राज्य शासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विविध ठिकाणी राजकीय पदावर मिरविणारे पदाधिकारी जनसेवेच्या नावाने लाखो रूपयांचा मलिदा लाटत आहेत. मात्र राज्य शासन पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने सुटीच्या दिवशीही कर्तव्य बजावण्यास लावून तुटपुंजे वेतन देऊन त्यांची बोळवण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही एक साप्ताहित सुटी असते. वर्षभरात त्यांना हक्काच्या ४८ सुट्या असतात. मात्र राज्यभरातील २ लाख पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत कुठे ना कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हक्काची सुटी उपभोगता येत नाही. हकाच्या सुट्यांपैकी केवळ दहा ते पंधरा सुट्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत घालवावयास मिळतात. अन्य सुटीच्या दिवशी त्यांना कर्तव्यावर राहणे भाग पडते.
पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर असल्यास त्यांना फक्त ११० रूपये वेतन दिले जाते तर सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ८० ते ९० रूपये वेतन दिले जाते. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ६८ रूपये वेतन दिले जाते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत वेतनाबद्दल कोणताही उल्लेख नाही. नियमानुसार या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या महिन्याच्या वेतनातील दिवसाप्रमाणे वेतन आकारणे आवश्यक आहे. त्यात सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांसाठी २ हजार ३३० रूपये, सहायक पोलीस निरीक्षक २ हजार २८२, पोलीस उपनिरीक्षक २ हजार २५० रूपये, सहायक पोलीस उपनिरीक्षक १ हजार ३२४ रूपये, पोलीस हवालदार १ हजार ३२० रूपये, पोलीस कॉन्स्टेबल १ हजार २८८ रूपये तर पोलीस नाईक १ हजार ३१० रूपये याप्रमाणे सुटीच्या दिवशीचा पगार मिळणे अपेक्षित असताना राज्य शासन मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून त्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर राबवून दोन वेळचे जेवणही मिळणार नाही एवढे अल्प वेतन देऊन पोलीस कर्मचाऱ्यांची बोळवण करीत असल्याचे दिसते.
संचारबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी पाणी व अन्नाचीही चणचण असते. अशाही परिस्थितीत ते रात्रंदिवस राबतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुटीच्या दिवशी कर्तव्यावर राबण्याचे तुटपुंजे वेतन देणे कितपत योग्य आहे याचा विचार राज्य शासन केव्हा करेल, अशी प्रतिक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Slightly paid salaries to the police working on the holidays