मेळघाटात चिमुकल्यांच्या रक्तात सिकलसेलचे विष; धारणी-चिखलदऱ्यात ८०० मृत्यूच्या दाढेत आनुवंशिक आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:58 IST2026-01-14T12:41:53+5:302026-01-14T12:58:43+5:30
Amravati : मेळघाटातील चटके कुपोषणाचे सोसणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसमोर सिकलसेलचे मोठे संकट आता उभे ठाकले आहे.

Sickle cell toxin found in children's blood in Melghat; Genetic disease responsible for 800 deaths in Dharani-Chikhaldara
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा :मेळघाटातील चटके कुपोषणाचे सोसणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसमोर सिकलसेलचे मोठे संकट आता उभे ठाकले आहे. विशेषतः शून्य ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, या दोन्ही तालुक्यांत तब्बल २८४ चिमुकले प्रत्यक्ष या आजाराने बाधित असून, हजारो मुले या आजाराचे वाहक बनले आहेत. एप्रिल २००९ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार, या दोन्ही तालुक्यांत मोठ्या संख्येने 'कॅरिअर' (वाहक) आणि 'सफरर' (बाधित) रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण चिंताजनक आहे. धारणी आणि चिखलदरा मिळून आतापर्यंत ७,५२९ वाहक आणि ८०३ बाधित रुग्ण समोर आले. प्रशासनाकडून या भागात जनजागृती आणि उपचारांवर अधिक भर देण्याची गरज आहे.
विवाहापूर्वी कुंडली नव्हे, रक्ताची तपासणी
प्रशासनाची आकडेवारी असलेल्या डेटावरून असे दिसून येते की, १६ ते २० आणि २० वर्षांवरील वयोगटात अविवाहित वाहकांची संख्या लक्षणीय आहे. सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्याने, भविष्यातील पिढीला यापासून वाचवण्यासाठी लग्नापूर्वी रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे.
१५ जानेवारीपासून तपासणी
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अरुणोदय ही विशेष सिकलसेल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.
वयोगटानुसार परिस्थिती :
- ० ते १० वर्षे : धारणीमध्ये ६६५ वाहक आणि १८५ बाधित मुले आहेत, तर चिखलदऱ्यात ५८७ वाहक आणि ९९ बाधित मुले आहेत.
- ११ ते १५ वर्षे : या वयोगटात धारणीत ५९१ वाहक, तर चिखलदऱ्यात ४२७वाहक रुग्ण आढळले आहेत.
- २० वर्षांवरील लोकसंख्या : २० वर्षांवरील विवाहित आणि अविवाहित व्यक्तींमध्येही हे प्रमाण मोठे आहे. एकट्या धारणी तालुक्यात २० वर्षांवरील २,०५६ विवाहित व्यक्ती सिकलसेलच्या वाहक आहेत. राज्यात आतापर्यंत १ कोटी ५ लाख ८६ हजार चाचण्या झाल्या असून, १२,४२० रुग्ण, १ लाख २४ हजार २७५ वाहक आढळले.