राज्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती; अनिल देशमुख यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 19:57 IST2021-02-04T19:57:00+5:302021-02-04T19:57:19+5:30
महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती; अनिल देशमुख यांची माहिती
अमरावती : राज्यात साडेबारा हजार पोलिसांची पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात लवकरच पाच हजार पोलिसांनी पदभरती करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेसात हजार पोलिसांची पदभरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त आले असताना गुरुवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. महिलेवरील दुर्देवी अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीला आजीवन कारवासाची शिक्षा झाली असेल तर त्याला फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न केले जात आहे. न्यायालयातही अशी प्रकरणे तातडीने निकाली निघावी, याकरिता आताच्या कायद्यात बदल करून त्याचे रुपांतर शक्ती कायद्यात करण्यात येत आहे. या कायद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
यासाठी सर्वपक्षीय २१ आमदारांची समिती गठित करण्यात आली असून, शक्ती कायद्याचे अंतिम प्रारुप तयार करणे सुरू आहे. अंतिम प्रारूप मंजूरीकरिता विधानसभा व विधानपरिषेदेच्या होऊ घातलेल्या अधिवेशनात ठेवण्यात येणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. पत्रपरिषदेला हर्षवर्धन देशमुख, सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र महल्ले आदी उपस्थिती होते.
कोरोना कर्तव्य बजवताना ३३० पोलीस शहीद
कोरोना काळात पोलिसांनी उत्तम कामगिरी केली. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस सक्षम असून यावेळी कोरोना योद्धा म्हणून राज्यात ३३० पोलीस शहीद झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
नागपुरचा गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता?
देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करीत आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री असताना व गृहखाते त्यांच्याकडे असताना नागपूरची किती गुन्हेगारी वाढली होती ते आता विसरले. नागपूरचा कुख्यात गुंड मुन्ना यादव हा कुणाचा कार्यकर्ता होता, असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. तुमच्या काळात तो तीन ते चार महिने फरार होता. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेता असताना मुन्ना यादव यांचा तपास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांचे मोबाईलचे कॉल तपासले पाहिजे, असा आरोप मुंडे यांनी केल्याची आठवणही गृहमंत्र्यांनी करून दिली व फडणवीस यांचा समाचार घेतला.