'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:58 IST2025-11-20T13:57:45+5:302025-11-20T13:58:40+5:30
Amravati : २१ व्या हप्त्याचा ९०.४१ शेतकऱ्यांना १८०८ कोटींचा लाभ

PM Kisan Yojana's filter doesn't stop; 6.10 lakh beneficiaries excluded for 21st installment
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता बुधवारी वितरित करणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार या लाभासाठी पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार राज्यात ९०,४१,२४१ शेतकरी पात्र आहेत व या शेतकऱ्यांच्या खात्यात १८०८.२५ कोटी रुपये बुधवारी जमा होणार आहेत. यामध्ये २० व्या हप्त्याच्या तुलनेत तब्बल ६,०९,९३० शेतकरी लाभार्थी कमी झाले आहेत.
यापूर्वी २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी ९६,५१,१७१ शेतकऱ्यांना दिला होता. यानंतर योजनेत अनेक फिल्टर लावण्यात आल्याने लाभार्थी संख्या कमी झाल्याची माहिती आहे. २१ वा हप्ता वितरित झाल्यानंतर किती शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ जमा झाला, यानंतर पात्र लाभार्थी संख्या समोर येणार आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे वर्षाला सहा हजारांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत २० हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर योजनेत अजून काही निकष जोडण्यात आले आहेत. यानुसार एका कुटुंबात एकालाच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे ६.१० लाख लाभार्थी वगळल्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
योजनेतील लाभार्थी संख्या
२० हप्ता खातेदार - ९६,५१,१७१
वितरित निधी - १९३०.२३ कोटी
२१ हप्ता खातेदार - ९०,४१,२४१
आवश्यक निधी - १८०८.२५ कोटी
यामुळे पात्र लाभार्थी संख्येत कमी
योजनेतील पात्र कुटुंबात पती, पत्नी व १८ वर्षांखालील मुले मिळून हा हप्ता आहे. मात्र, काही लाभार्थीनी पत्नीचीही नोंदणी केल्याची बाब केंद्राच्या निदर्शनात आलेली आहे. अशा स्थितीत संबंधित शेतकरी खातेदाराचा हप्ता बंद करून त्याच्या पत्नीला योजनेचा लाभ देण्याचे धोरण आहे, यासोबतच अन्य निकषांमुळे योजनेतील पात्र लाभार्थी संख्येत घट झाल्याची प्रशासनाची माहिती आहे.