प्रेम हे प्रेम असतं : मंगेश पाडगावकरांना स्केचद्वारे श्रद्धांजलीअमरावती : जागतिक मराठी अकादमी, 'शोध मराठी मनाचा' संमेलन २०१६ चा शनिवारी थाटात समारोप झाला. यापूर्वी झालेल्या चित्र-शिल्प-काव्य या कार्यक्रमात अनेक नामवंत चित्रकारांनी स्केचेस काढल्या, तर शिल्प कला व कवितांचेही या ठिकाणी उत्कृष्ट सादरीकरण झाले. यावेळी नामवंत कवी अरुण मात्रे यांनी मंगेश पाडगावकरांची 'प्रेम हे प्रेम असतं, तुमचं नि आमचे सेम असतं' ही कविता त्यांनी खुमासदार शैलीत सादर केली. एकीकडे त्यांची कविता सुरू होती, तर दुसरीकडे नामवंत चित्रकार विजय राऊत हे मंगेश पाडगावकरांचे चित्र हुबेहूब रेखाटत होते. अशी आगळी वेगळी श्रद्धांजली या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंबानगरीतील श्रोत्यांच्या साक्षीने त्यांना देण्यात आली. यावेळी काही क्षणापुरते अमरावतीकर भाऊक झाले होते. दरम्यान जगप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी माजी आमदार बी.टी. देशमुख यांची हुबेहूब शिल्पकृती साकारली. चंद्रजित यादव, शिवा प्रजापती यांनीही आपली कला सादर केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अविनाश राचमाले (अमेरिका) यांचेही हुबेहूब चित्र विजय राऊत यांनी काढून भारतीय कलेची त्यांना अनमोल भेट दिली.विजय बोधनकर यांनीही चित्रकला सादर केली. अशोक नायगावकर, अरुण मात्रे, साहेबराव ठाणगे, सिसिलिया काव्हालो, नितीन देशमुख, तुकाराम धांडे, भरत दौंडकर, साहित्यिक रामदास फुटाणे यांनी दर्जेदार कवितांच्या माध्यमातून उपस्थितांची दाद मिळविली. व्यासपीठावर अभिनेते विक्रम गोखले, अविनाश राचमाले, गिरीश गांधी आ.सुनील देशमुख, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, आदी उपस्थित होते. संचालन रामदास फुटाणे, आभार प्रदर्शन सोमेश्वर पुसतकर यांनी मानले. यावेळी अंबानगरीतील रसिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. (प्रतिनिधी)
चित्रशिल्प, काव्य कलेचे सादरीकरण
By admin | Updated: January 4, 2016 00:13 IST