'कुणी व्हिडिओ तर काढत नाही आहे ना?' विचारत अधिकारी म्हणाले 'महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशचे रस्ते गुळगुळीत !'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:36 IST2025-12-06T14:35:10+5:302025-12-06T14:36:42+5:30
Amravati : मेळघाटातील काटकुंभआरोग्य केंद्राची घेतली झाडाझडती

"No one is taking videos, is they?" the officer asked, "The roads in Madhya Pradesh are smoother than those in Maharashtra!"
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मध्य प्रदेशातील रस्ते महाराष्ट्राच्या तुलनेत गुळगुळीत आहेत, अशी कबुली आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली. हे बोलत असताना, कुणी व्हिडिओ तर काढत नाही आहे ना, अशी विचारणा करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मध्य प्रदेशातील अनेक रुग्ण उपचारकरिता काटकुंभ येथील आरोग्य केंद्रात येतात.
काटकुंभ चुर्णी परिसरात जाण्यासाठी मध्य प्रदेशचा काही भाग ओलांडून जावे लागते सचिवांचा ताफासुद्धा याच भागातून गेला, तेव्हा तिथले रस्ते चांगले असल्याच्या प्रत्यय त्यांना आला.
तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राला वाघमारे यांनी शुक्रवारी भेट दिली, दरम्यान, त्यांनी औषधी पुरवठा, केंद्रातील सोयी-सुविधा, रुग्णसेवेतील प्रमुख अडचणी यासह बाल व माता मृत्यूचे नेमके कारण काय, याविषयावर डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मार्गदर्शन केले. स्थानिक पदाधिकारी तथा नागरिकांशी संवाद साधत प्रशासन नेमके कुठे कमी पडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद बांधकाम विभागासह विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणीदेखील केली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, एडीएचओ परिसे, तहसीलदार जीवन मोराणकर, गटविकास अधिकारी विजय खेडकर, सीडीपीओ वानखडे, काटकुंभच्या सरपंच ललिता बेठेकर, पीयूष मालविया, कमलेश राठौर, सोनू मालवीय, शिवा जैसवालसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
केव्हा संपणार काळ्या पाण्याची शिक्षा ?
- काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील १० ते १५ वर्षांपासून कार्यरत परिचारिकांनी आम्हाला कायम सेवेत समावून घ्या, अन्यथा मेळघाट बाहेर बदली करा, अशी मागणी केली.
- इतक्या वर्षापासून आम्ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगतोय, ती केव्हा संपणार? असा प्रश्न उपस्थित करत सचिवांच्या पुढ्यात आपली कैफियत मांडली. याशिवाय परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.