अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी प्राणवायूचा तुटवडा झाल्याने एकच तारांबळ उडाली. अतिदक्षता विभागात उपचार घेणारे कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या सेवेसाठी धावपळ झाली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, हे विशेष.
पीडीएमसीत नाशिकप्रमाणे बुधवारी सायंकाळी ७ वाजता प्राणवायूचा स्फोट झाला अशी जोरदार चर्चा होती. मात्र, प्राणवायूचा तुटवडा झाल्यामुळे तारांबळ उडाली. यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, असे रूग्णालयाने गुरूवारी स्पष्ट केले. अतिदक्षता विभागात कोविड, नॉन कोविड रूग्ण उपचार घेत असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्राणवायू संपला. रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची ओरड नातेवाईकांनी केली. त्यामुळे पीडीएमसीत एकच धावपळ झाली. पीडीएमसीचे मु्ख्य प्रवेशद्धार काही वेळेसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे नेमके काय झाले, हे रुग्णांच्या नातेवाईकांना कळायला मार्ग नव्हता. दरम्यान अचानक येथील चार रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर प्राणवायूचा तुटवडा असल्याचे लक्षात आले. मात्र, पीडीएमसीच्या चमुंनी रुग्णांना पुन्हा प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी केलेली धावपळ रुग्णसेवेचे प्रतीक ठरले.
-------------
कोट
रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा आहे. यातून मार्ग काढला जात असून, प्राणवायू मुबलक प्रमाणात लवकरच उपलब्ध होईल. रुग्णसेवा आणि लोकांच्या जीवाची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री.
कोट
रुग्णालयात प्राणवायूचा स्फोट झाला नाही. केवळ प्राणवायूचा तुटवडा झाला होता. मात्र, रुग्णालयातील चमुने ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. काही तासांतच कोविड, नॉन कोविड रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यात आला.
- अनिल देशमुख, अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय