फोटो -
चक्रीच्या नावावर लोकांची लुबाडणूक : कांडलीत पोलिसांची धाड
परतवाडा : अचलपूर तालुक्यात अवैध ऑनलाईन लॉटरीचा सुळसुळाट असून, त्याआड चक्रीचा खेळ हा अवैध जुगार खेळवला जात आहे. यात लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. कांडलीतील अशाच एका अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरवर परतवाडा पोलिसांनी धाड टाकून तेथील साहित्य व लोकांना पोलीस ठाण्यात आणले होते. माणसे व साहित्य सोडून देण्यात आले तरी पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या अवैद्य लॉटरी, दारू, जुगार व अन्य अवैध व्यवसायाविषयी एका महिलेने परतवाडा पोलीस ठाण्यात २३ जुलैला तक्रार दिली. या तक्रारीबाबत कारवाई होत नसल्याचे पाहून अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अब्दागीरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी परतवाडा पोलीस ठाण्याला चौकशीचे आदेश दिले. यानंतर हे धाडसत्र पार पडले.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार या तक्रारकर्त्या महिलेने तक्रार मागे घ्यावी म्हणून तिच्या घरी जाऊन काही मंडळींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याची मौखिक तक्रारसुद्धा महिलेने परतवाडा पोलिसांकडे केली आहे. ही तक्रारसुद्धा परतवाडा पोलिसांनी चौकशीत ठेवली आहे.
-----------------------
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. प्रकरण चौकशीत आहे. राजस्व विभागाकडून माहिती घेतल्यानंतर पुढील कारवाई करता येईल.
- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा
------------------
आधी करमणूक कर निरीक्षक तहसील स्तरावर असायचे. आता हे पद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. तेथूनच करमणूक कर हा विषय हाताळला जातो. पोलीस ठाण्यातूनही याविषयी माहिती विचारली गेली.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर