समुपदेशकानेच केला वारंवार बलात्कार; तक्रार केल्यास, जेलमधून परतताच गेम करेन म्हणत धमकावले
By प्रदीप भाकरे | Updated: October 11, 2023 14:31 IST2023-10-11T14:00:29+5:302023-10-11T14:31:05+5:30
व्हिडीओ व्हायरलची धमकी : आरोपी विवेक राऊतविरूद्ध गुन्हा

समुपदेशकानेच केला वारंवार बलात्कार; तक्रार केल्यास, जेलमधून परतताच गेम करेन म्हणत धमकावले
अमरावती : प्रियकरासोबत लग्न लावून देण्याची बतावणी करून एका समुपदेशकानेच समुपदेशनासाठी आलेल्या उच्चशिक्षित तरूणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. २० मे ते ८ ऑक्टोबरदरम्यान अत्याचाराची ती मालिका घडली. याप्रकरणी २६ वर्षीय पिडिताच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी आरोपी विवेक राऊत (३३, रा. अमरावती) याच्याविरूद्ध बलात्कार, विनयभंग, धमकी व मारहाण व बदनामीचा गुन्हा दाखल केला. पोलीस तक्रार केल्यास जेलमधून सुटून आल्यानंतर तुला जीवाने मारून टाकेन, अशी धमकी देखील त्याने दिली.
गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या माहितीनुसार, आरोपी विवेक राऊत हा तारांगणनगर येथे राष्ट्रमाता सावित्रीआई फुले समुपदेशन व कौटुंबिक सल्ला केंद्र चालवितो. रोहन नामक तरूणाशी आपले सन २००२ पासून प्रेमसंबंध असून त्याचे कुटूंब लग्नास नकार देत असल्याची समस्या घेऊन ती आईसह विवेक राऊतकडे गेली होती. २८ मार्च रोजी त्याने २६ वर्षीय पिडिता व तिच्या प्रियकराचे समुपदेशन केले होते.
दोन चार दिवसांनी आरोपी विवेक हा त्या तरूणीच्या घरी पोहोचला. आपण स्वाधार नावाचे केंद्र उघडत असून, तुमची नातेवाईक डिप्रेशनमध्ये आहे, तिला घराबाहेर जाऊ द्या, अशी बतावणी त्याने तरूणीच्या कुटुंबियांकडे केली. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला विवेक राऊतसोबत त्याच्या कार्यालयात जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून आरोेपी हा तिला त्रास देऊ लागला.