पती - पत्नीचा मृतदेह सापडला झाडाला लटकलेल्या अवस्थेत ; आत्महत्या की घातपात ? गावकरी बोलण्यास तयार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:02 IST2025-11-19T18:01:11+5:302025-11-19T18:02:05+5:30
Amravati : दोघे गोबरकहू येथील रहिवासी, गावापासून चार किमी अंतरावर केला अंत

Husband and wife's bodies found hanging from a tree; Suicide or murder? Villagers not ready to talk
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील कारादा येथील तलावाजवळील जंगलात गोबरकहू येथील नवतरुण दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावापासून हे अंतर चार किमी आहे. बकऱ्या चारणाऱ्या मुलाच्या ही घटना निदर्शनास आल्यानंतर ही घटना उजेडात आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात, या चर्चेला उधाण आले आहे.
पोलिस सूत्रांनुसार, गोबरकहू येथील विलास हरिराम बेठेकर (२६) आणि त्याची पत्नी वैशाली विलास बेठेकर (१९) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह गावापासून चार किलोमीटर अंतरावरील कारादा येथील तलावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका मुलाने बघितले. तो मुलगा बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. त्याने घटनेची माहिती गावात येऊन दिली. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले. जमादार मनोज लढे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे पोस्टमार्टम करण्याकरिता दाखल केले. सोमवारी पती-पत्नीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून ते आप्तजनांच्या ताब्यात देण्यात आले.
आपसातील भांडणाने केला संसाराचा विस्कोट ?
ठाणेदार अवतारसिंह चौहान यांनी या घटनेबाबत ग्रामस्थांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, याबाबत कुणीही काहीही बोलायला तयार नाहीत. तथापि, दोघांमध्ये भांडण होत असल्याचे तपासाच्या दरम्यान माहिती मिळाली आहे. तूर्तास पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे.
पत्नी होती गर्भवती
एकाच वेळी पती-पत्नीने जंगलात जाऊन गळफास घेतल्याची घटना घडल्यामुळे परिसरात चांगलीच चर्चा परिसरात ऐकू येत आहे. मृत वैशाली ही गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची चर्चा दोन दिवस उलटूनही थांबलेली नाही.