बचत गटाच्या महिलांचा पंचतारांकित अभ्यास दौरा

By Admin | Updated: May 22, 2014 23:22 IST2014-05-22T23:22:25+5:302014-05-22T23:22:25+5:30

चूल आणि मूल सांभाळत कुटुंबाचा गाडा ओढणार्‍या गरीब व सामान्य घरातील २०० महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मुंबईत पंचताराकित अभ्यास दौरा करण्याची संधी मिळणार आहे.

Five-week study tour of women of saving group | बचत गटाच्या महिलांचा पंचतारांकित अभ्यास दौरा

बचत गटाच्या महिलांचा पंचतारांकित अभ्यास दौरा

अमरावतीला बहुमान : वर्ल्ड ट्रेड सेंटर, ‘ताज’ला भेट

गणेश वासनिक -अमरावती

चूल आणि मूल सांभाळत कुटुंबाचा गाडा ओढणार्‍या गरीब व सामान्य घरातील २०० महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मुंबईत पंचताराकित अभ्यास दौरा करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित वस्तुंना बाजारपेठ मिळविण्याच्या अनुषंगाने राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाने २० जून रोजी हा दौरा आयोजित केला आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत अमरावतीत बचत गटाची मोहीम चालविली जाते. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुशंगाने कर्ज वाटप, उद्योग उभारणीसाठी मदत, उत्पादित वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याऐवजी ‘राष्ट्रीय लाईवहुड मिशन’ या नावाने नवीन योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. परिणामी यंदा बचत गटांना कर्जवाटप प्रक्रिया राबविता आली नाही. त्यामुळे सुवर्ण जयंती योजनेतील राखीव निधीतून महिलांच्या पंचतारांकित अभ्यास दौर्‍यावर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषद संचालनालयाने हा बहुमान अमरावती महापालिकेला दिला असून बचत गटाच्या २०० महिलांचा पंचताराकित अभ्यास दौरा हा राज्यातील पहिला प्रयोग ठरणारा आहे. महापालिकेत नोंदणी असलेल्या बचत गटांपैकी एका बचत गटातून किमान दोन महिलांना अभ्यास दौर्‍याची संधी मिळावी, या अनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे. मुंबईला ये-जा करण्यासाठी रेल्वेचे आरक्षणसुध्दा झाले आहे.

Web Title: Five-week study tour of women of saving group