लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वस्त रासायनिक खत असल्याने युरियाचा अनिर्बंध वापर सध्या खरीप, रब्बी व बागायती पिकांसाठी होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत असताना पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासदेखील घातक आहे.
युरियाचा अनिर्बंध वापर सध्या पिकांसाठी होत असल्याने मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. युरियामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा समज शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळेच युरियाचा वापर वाढला आहे. प्रत्यक्षात हा गैरसमज आहे. केवळ युरियाच नव्हे तर डीएपीसह अनेक रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. युरिया जमिनीत मुरल्यानंतर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते व नदी, नाले, विहिरी, कूपनलिकांमधील पाण्यात मिसळले जाते व पिण्याच्या पाण्याद्वारे नायट्रेट शरीरात जात असल्याने मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मानवी आरोग्यावर होतात परिणामपिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आल्यास व हे पाणी लहान मुले, गर्भवती महिलांच्या पिण्यात आले तर अशा पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. असे आरोग्य विभागाने सांगितले.
पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढतेपिण्याच्या पाण्यात युरियामुळे नायट्रेट मिसळले जाते. या पाण्यामध्ये नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. पाणी परीक्षण प्रयोगशाळांच्या अहवालानुसार काही पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण हे ६० ते ८० मिली ग्रॅमपर्यंत आढळले आहे. त्यामुळे युरियाचा अतिवापर टाळणे महत्त्वाचे आहे. दूषित पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यासह अनेक आजार होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले
"युरियापेक्षा द्रवरूप नॅनो युरिया वापरल्यास धोका कमी होतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये दाणेदार युरियाचा वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे धोक्याचे प्रमाणदेखील वाढतच असल्याने कृषी विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे."- प्रवीण राऊत, शेतकरी