उत्कृष्ट ‘सीआर’साठी आयुक्तांचीही परीक्षा

By Admin | Updated: June 9, 2017 00:22 IST2017-06-09T00:22:45+5:302017-06-09T00:22:45+5:30

महापालिका आयुक्तांसाठी विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र ‘केआरए’ निश्चित करण्यात आले आहे. वसुली, घनकचरा व्यवस्थापन,

Commissioner's examination for the best 'CR' | उत्कृष्ट ‘सीआर’साठी आयुक्तांचीही परीक्षा

उत्कृष्ट ‘सीआर’साठी आयुक्तांचीही परीक्षा

‘केआरए’ निश्चित : सहा सेवांच्या अंमलबजावणीसाठी १०० गुण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आयुक्तांसाठी विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र ‘केआरए’ निश्चित करण्यात आले आहे. वसुली, घनकचरा व्यवस्थापन, महापालिकेच्या स्वउत्पन्न वाढीसाठी विशेष उपाययोजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १०० गुण देण्यात आले आहेत. या सहा घटकांमध्ये आयुक्तांनी केलेली कामगिरी राज्यस्तरावर तपासण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक ३० गुण घनकचरा व्यवस्थापनासाठी असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर आयुक्तांचा वार्षिक गोपनीय अहवाल (सीआर) लिहिला जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात विविध सहा घटकांमधील कामकाज व त्यांच्या प्रगतीच्या आधारे सन २०१७-१८ च्या कार्यमूल्यांकन अहवाल व वार्षिक गोपनीय अहवालासाठी मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. मालमत्ता कर व इतर करांच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसुलीसाठी १० गुण देण्यात आले आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोताचा पाया बळकट करून उत्पन्नात वाढ करणे, यात मालमत्ता करवसुलीसाठी जीआयएस प्रणालीचा अवलंब करणे, सर्व मालमत्ता कराच्या जाळ्यात आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आयुक्तांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार दुकान गाळे भाड्याच्या दरांचे पुनर्विलोकन करणेही आयुक्तांच्या केआरएमध्ये समाविष्ट केले आहे. नगरोत्थान, अमृतमधील योजना पूर्ण करणे, स्मार्ट सिटीसह २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत शह हागणदारीमुक्तीवरही आयुक्तांचा ‘सीआर’ अवलंबून आहे.
याशिवाय घनकचरा विलगीकरण मोहीम, घनकचऱ्याचे ९० टक्के विलगीकरण तसेच ३१ मार्च २०१८ पर्यंत ओल्या कचऱ्याचे कम्पोस्टिंग करणेही आयुक्तांनाच बंधनकारक करण्यात आले आहे. अर्थात महापालिका आयुक्तांना ‘काम’ करून दखवायचे असून उद्दिष्ट्यपूर्तीवरच त्यांचे पुढील प्रशासकीय भवितव्य अवलंबून आहे.

यावर ठरणार गुणांक
विविध करांच्या वसुलीसाठी २० गुण, महापालिकेच्या स्वउत्पन्नवाढीच्या विशेष उपाययोजनांसाठी २० गुण, पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० गुण, शहर हागणदारीमुक्त केल्यास १० गुण, घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वाधिक ३० गुण आणि सेवा हमी कायदा अंमलबजावणी व अन्य प्रशासकीय बाबींसाठी १० असे १०० गुण ‘केआरए’साठी निश्चित करण्यात आले आहेत.

सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी
सेवाहमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. आपले सरकार, लोकशाही दिन, महालेखापालांचे आक्षेप, लोकलेखा समितीशी संबंधित बाबींवर कालमर्यादेत कारवाई, लोकआयुक्त प्रकरणे, विधान मंडळाशी संबंधित कामकाज, न्यायालयीन प्रकरणांबाबत आयुक्तांना कालमर्यादेत कार्यवाही करावी लागेल. यासाठी १० गुण देण्यात आले आहेत.

Web Title: Commissioner's examination for the best 'CR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.