चिमुकला सुखरूप, किडनॅपर अहमदनगरचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:01:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण ...

Chimukala safe, kidnapper Ahmednagar | चिमुकला सुखरूप, किडनॅपर अहमदनगरचे

चिमुकला सुखरूप, किडनॅपर अहमदनगरचे

Next
ठळक मुद्देमहिलेसह पाच जणांना अटक, अहमदनगर-अमरावती पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण मार्गावरून ताबा घेतला. अपहृत मुलगा सुखरुप असल्याची माहिती अमरावतीत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अमरावती शहरात आनंद व्यक्त केला गेला. 
अहमदनगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि अमरावती पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींसह अपहृत चिमुकल्याला घेवून तपास पथक अहमदनगरहून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहे. शनिवारी सकाळी चिमुकला शहरात पोहोचेल. मुलाच्या अपहरणाने सैरभैर झालेल्या आई-वडिलांच्या नजरा त्याच्या वाटेकडे रोखल्या गेल्या आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकीजवळ, कोठला, अहमदनगर), अलमास ताहीर शेख (१८, रा. कोठला, अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) या तिघांना  प्रथम अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले गेले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अपहृत मुलगा आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तपास पथकाने अहमदनगर शहरात शोध  सुरू केला. अपहरणकर्ते मुलाला घेऊन अहमदनगरहून कल्याणच्या दिशेने गेल्याची माहिती त्यांना मिळाली. मुलाला दुचाकीहून नेले जात असताना  ग्रामस्थांच्या मदतीने तपास पथकाने दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. 
याप्रकरणातील सर्व आरोपी तरुण आहेत. ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावतीहून तपास पथक  बुधवारी रात्री अहमदनगर येथे रवाना करण्यात आले असताना अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला. अमरावती आणि अहमदनगर पोलिसांच्या संयुक्त आणि वेगवान कारवाईमुळे अपहृत मुलगा सुखरुपरित्या हाती लागला. या प्रकरणात आणखी कुणी मास्टरमाईंड आहे का? अपहरण करणारी ही टोळी यापूर्वीही अशा घटनांमध्ये लिप्त होती की कसे, याचा शोध अमरावती पोलीस घेणार आहेत. चिमुकल्याच्या अपहरणाने हळहळलेली अमरावती आता आनंद व्यक्त करीत आहे. 

आजीवर संशयाची सुई
चिमुकल्याचे अपहरण झाले तेव्हा त्याच्यासोबत आजी होती. त्यामुळे गुरुवारी त्यांचे बयाण नोंदवून शुक्रवारी सकाळपासून कसून चौकशी केली. आरोपी हिनाला ती ओळखत असल्याचे तसेच तिचेही माहेर अहमदनगर असल्याचे पुढे आले. त्यामुळे अपहरणामध्ये आजीचा तर सहभाग नाही ना, यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत.

तीन बहिणींनाही आनंद 
पोलिसांनी पुतण्याचा शोध घेतल्याची माहिती पथकासोबत अहमदनगर येथे गेलेल्या काकांनी अमरावतीला फोन करून कुटुंबातील सदस्यांना दिली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुलाच्या सख्ख्या मोठ्या बहिणीचासुद्धा आनंद गगनात मावेनसा झाला. आपला भाऊ नेहमीप्रमाणे पुन्हा आपल्यासोबत खेळणार, हा आनंद त्याच्या बहिणींना होता. सदर मुलगा घरात व परिसरात सर्वांचा लाडका आहे. तो मिळाल्याने परिसरातील लोकांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे. 

मुलाच्या घरी नातेवाइकांची गर्दी
शारदानगर येथील मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या घरी नातेवाइकांनी व आप्तस्वकियांनी गर्दी केली. बुधवारी रात्रीपासून तर शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्याकडे नातेवाईक तसेच राजकीय तथा विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. मुलगा सुखरूप असल्याची माहिती दुपारी पोलिसांनी कुटुंबीयांना दिल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर पुन्हा नातेवाइकांनी गर्दी केली.  काहींनी मुलगा सुखरूप असल्याबाबत समाधान व्यक्त केले, तर काहींनी पोलिसांचे आभार मानले. 

अहमदनगर शहरातून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यात अपहरण करणाऱ्या दोन आरोपींचाही समावेश आहे. खंडणीसाठी अपहरण केले असावे. त्या दिशेने तपास सुरू आहे. मुलाच्या आजीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
आरती सिंह, पोलीस आयुक्त

 

Web Title: Chimukala safe, kidnapper Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.