मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

By Admin | Updated: June 12, 2014 21:46 IST2014-06-12T21:46:24+5:302014-06-12T21:46:47+5:30

क्षतिग्रस्त हाय टेंशन तार जोडण्यास लागला विलंब

Central Railway Transportation Simplified | मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

 अकोला : बुधवारी सायंकाळी झालेल्या धुवाधार पावसामुळे अमरावती विभागातील मान्याजवळील मंडुरा या लहानशा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर व मुंबई या अप व डाऊन मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पडलेली झाडे उचलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धस्तरावर काम सुरू केल्यानंतर रात्री १ वाजता अप व डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. वादळी वार्‍यासह धुवाधार झालेल्या या पावसामुळे अमरावती विभागातील माना ते कुरूमदरम्यानच्या मंडुरा रेल्वे स्थानकानजीक पाच सहा झाडे रेल्वे मार्गावर उन्मळून पडली होती. यामुळे अप लाईनची हाय टेंशन तार तुटल्याने व पडलेल्या झाडांचे अवशेष डाऊन लाईनवर पसरले असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने पाऊस ओसरताच रेल्वे मार्गवर पडलेली झाडे बाजूला सारण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले. रात्री ११.३0 वाजताच डाऊन लाईन क्लिअर झाली होती. तर अप लाईनची क्षतिग्रस्त हाय टेंशन वायर जोडण्यास १ वाजल्याने, पुणे-मुंबईकडे जाणार्‍या गाड्या ६ ते ८ तास उशिराने धावल्या.

** या गाड्यांना झाला विलंब

वाहतूक विस्कळीत झाल्याने पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, हावडा-पोरबंदर एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस, अमरावती-मुंबई एक्सप्रेस या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ६ ते ८ तास उशिराने अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. तर डाऊन लाईन लवकरच सुरळीत झाल्याने या मार्गावर धावणार्‍या गाड्यांना फार काळ खोळंबून राहावे लागले नाही. अकोला रेल्वे स्थानकावर गाड्यांची वाट पाहणार्‍या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले.

Web Title: Central Railway Transportation Simplified