तलाठय़ाला लाच घेताना पकडले

By Admin | Updated: May 20, 2014 23:17 IST2014-05-20T23:17:55+5:302014-05-20T23:17:55+5:30

वारसाचा दाखला देण्यासाठी लाच स्वीकारणार्‍या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. ही कारवाई बडनेरा पोलीस ठाण्यासमोर

Caught the money while taking a bribe | तलाठय़ाला लाच घेताना पकडले

तलाठय़ाला लाच घेताना पकडले

अमरावती : वारसाचा दाखला देण्यासाठी लाच स्वीकारणार्‍या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. ही कारवाई बडनेरा पोलीस ठाण्यासमोर सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता करण्यात आली.

नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील माजरी म्हसलाचे तलाठी विनोद विठ्ठलराव इंगळे यांना एक हजार रूपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. नांदगाव तालुक्यातील दादापूर वाकपूर येथील रहिवासी मधुकर ढवळे यांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी वारसाच्या दाखल्याची गरज होती.

यासाठी त्यांनी या भागातील तलाठी विनोद इंगळे यांच्याशी संपर्क साधला. हा दाखला मिळण्याकरिता तलाठी इंगळे यांनी दीड हजारांची लाच मागितली. यातील ५00 रूपयांची लाच यापूर्वीच स्वीकारली होती. उर्वरित एक हजार रूपये मिळेपर्यंत दाखला मिळणार नाही असे इंगळेने सांगितले होते. त्यामुळे मधुकर ढवळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व आपली कैफियत मांडली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचला. लाच स्वीकारण्यासाठी तलाठी इंगळे ने बडनेरा पोलीस ठाण्यासमोर मधुकर ढवळे यांना बोलावून घेतले. ढवळे यांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.

ठरलेल्या वेळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बडनेरा पोलीस ठाण्यासमोर सापळा रचला. याची साधी चुणूकही लागू दिली नाही. तलाठी विनोद इंगळे याने ढवळे यांच्याकडून सायंकाळी ६.१५ वाजता एक हजार रूपयाची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड घालून इंगळे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Caught the money while taking a bribe