तालुकास्तरीय क्रीडा संकुलात सर्व सुविधा निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:10+5:302021-02-05T05:32:10+5:30

बच्चू कडू, आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना चांदुर बाजार - जिल्हा नियोजन समिती तसेच तालुका क्रीडा समितीच्या अनुषंगाने नियोजित आराखडा ...

Build all facilities in taluka level sports complex | तालुकास्तरीय क्रीडा संकुलात सर्व सुविधा निर्माण करा

तालुकास्तरीय क्रीडा संकुलात सर्व सुविधा निर्माण करा

बच्चू कडू, आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

चांदुर बाजार - जिल्हा नियोजन समिती तसेच तालुका क्रीडा समितीच्या अनुषंगाने नियोजित आराखडा तयार करून संकुलाचे काम पूर्णत्वास न्यावे. लीज पद्धतीने दुकानांचे गाळे देताना कालावधी, दुरुस्ती व देखभाल, नियमित भाडे, अटी व शर्ती आदी बाबींचा करारात स्पष्ट उल्लेख करावा. चांदूर बाजार व अचलपूर येथील क्रीडा संकुलाच्या परिसरातील अतिक्रमणे हटविताना संबंधितांना पूर्वकल्पना देऊन वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.

चांदूर बाजार तहसील कार्यालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व ऊर्जा विभागाचा सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज स्थूल, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, कार्यकारी अभियंता दीपक आघाव, उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे, वानखडे यांच्यासह अन्य विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

कृषिपंप वीज धोरण-२०२० राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कृषी ग्राहकांना वीज बील थकबाकीची रक्कम भरणा करण्यासाठी सवलत दिली जात आहे. वसूल होणारी सवलतीची रक्कम संबंधित ग्राम पंचायतीत विकासनिधी म्हणून जमा होऊन गावांच्या विकासाला हातभार लागू शकतो. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ना. कडू यांनी केले. यावेळी कृषिपंप वीज धोरणात अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ देता येईल, याची यादी तयार करण्याचे आदेश राज्यमंत्री कडू यांनी महावितरण विभागाला दिले.

आढावा बैठकीत अतिवृष्टीमुळे पडझड व नुकसान झालेल्या घरांच्या कुटुंबांना ना. कडू यांच्या हस्ते नुकसानभरपाईच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

Web Title: Build all facilities in taluka level sports complex