बडनेरात लाचखोर मुख्याध्यापिका, सहायक शिक्षिका ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:21 IST2025-04-25T21:18:30+5:302025-04-25T21:21:07+5:30
७५० रुपयांचा किरकोळ रकमेचा मोह नडला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बडनेरात लाचखोर मुख्याध्यापिका, सहायक शिक्षिका ताब्यात
बडनेरा : किरकोळ रकमेची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिका व सहायक शिक्षिकेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. बडनेरातील होलीक्रॉस हिंदी प्रायमरी शाळेचे हे कर्मचारी आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, संगीता फ्रान्सिस धनवटे (४२, रा. टीचर्स क्वार्टर) ही मुख्याध्यापिका व अश्विनी विजय देवतारे (३७, रा. भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेसनगर रोड, अमरावती) असे लाच घेणाऱ्या सहायक शिक्षिका आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराचा मुलगा होली क्रॉस हिंदी प्रायमरी शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. शाळेला शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळत असतानाही वार्षिक शैक्षणिक शुल्क १५५० रुपये आकारले जाते. त्यापैकी ८०० रुपये यापूर्वी तक्रारदाराने दिले. उर्वरित ७५० रुपये देण्यासाठी वर्गशिक्षिका असलेली सहायक शिक्षिका व मुख्याध्यापिका वारंवार मागणी करीत असल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील कार्यालयाला देण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक भारत जाधव, केतन मांजरे, अंमलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले, शैलेश कडू, चित्रा वानखेडे व राजेश बहिरट यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता.